शिवसेनेने काढली हिंदू एकता रॅली
By Admin | Updated: June 29, 2017 00:39 IST2017-06-29T00:39:08+5:302017-06-29T00:39:08+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला अटक व भंडाराचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी ...

शिवसेनेने काढली हिंदू एकता रॅली
महामार्गावर निदर्शने : नरेंद्र भोंडेकर यांच्यासह १९ कार्यकर्त्यांना अटक-सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला अटक व भंडाराचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने बुधवारला सकाळी भंडारा बंदचे आवाहन करून हिंदू एकता रॅली काढली. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली.
त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प राहिली. त्यानंतर पोलिसांनी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ लोकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणीविरूद्ध भोंडेकर हे भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार घेण्याऐवजी आरोपीला पाठिशी घालण्याचा ठाणेदारांनी प्रयत्न केल्याचा आरोप करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करून सेनेने हिंदू एकता रॅली काढली. राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासनाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भोंडेकर यांनी केला.
या हिंदू एकता रॅलीत शिवसेना वगळता अन्य कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. यापुढेही हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी तुरूंगात जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, अनिल गायधने, उपसभापती ललीत बोंद्रे, यशवंत सोनकुसरे, प्रमोद केसलकर, सतीश तुरकर, दिनेश गजभिये, शेखर पंचबुद्धे, प्रभू हटवार, नरेश लांजेवार, जयंत बुधे, संदिप सार्वे, सुरेश धुर्वे, मुकेश थोटे, राजू ब्राम्हणकर यांनी घेतली होती.
शाळा राहिल्या बंद
शिवसेनेने पुकारलेल्या बंदमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळच्या सुमारास काही वेळ दुकाने बंद ठेऊन त्यानंतर उघडली. परंतु शिवसेनेच्या या आवाहनामुळे परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, या काळजी घेत शाळांना सुटी दिली.