वैजेश्वर घाटात शिवभक्तांचा मेळावा
By Admin | Updated: July 27, 2014 23:35 IST2014-07-27T23:35:03+5:302014-07-27T23:35:03+5:30
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ही बालकवींची कविता श्रावण मास प्रारंभ होताच मुखी येते. बालकवींची ही कविता तंतोतंत लागू पडते.

वैजेश्वर घाटात शिवभक्तांचा मेळावा
पवनी : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ही बालकवींची कविता श्रावण मास प्रारंभ होताच मुखी येते. बालकवींची ही कविता तंतोतंत लागू पडते. नयनरम्य हिरवे गार शालूने नटलेल्या वसुंधरेला पाहून मन प्रसन्न होऊन जाते. अशातच या श्रावणमासात भोळ्या शंकरांची मनोभावे पूजा केली जाते. पवनी तालुक्यात विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या घाट परिसरातील वैजेश्वर घाटात श्रावण मासानिमित्त शिवभक्तांची मांदियाळी पहायला मिळणार आहे.
चातुर्मासातील चार महिन्यांपैकी श्रावण महिना सर्वाधिक श्रेष्ठ मानला गेला आहे. पौराणिक ग्रंथातही श्रावण मासाची मोठी महिमा सांगण्यात आली आहे. कारण या महिन्यात जवळजवळ सर्वच दिवस विविध व्रतवैकल्यांनी गजबजलेले असतात. जीवतीच्या अमावस्येनंतर येणारा पहिला सोमवार हा श्रावणमास म्हणून गणला जातो. कधीकधी श्रावण सोमवार चार वेळा तर कधी कधी पाच वेळा येतो. तिथीनुसार यात बदल होत असतात. श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारच्या तत्पूर्वी रविवारी जागृती करण्यात येते. यात मौन धारण करून स्नान केल्यावर सूर्याची पूजा करण्यात येते. तसेच आदित्य राणूबाईची गोष्ट श्रवण केली जाते.
सोमवारी उपवास करून महादेवाचा अभिषेक करून शिवामृत अर्पण केली जाते. त्याचप्रमाणे गायत्री महामंत्राचा जाप करून नवनाथ भक्तविजय, शिवलिलामृत, पुराणग्रंथ, गुरुचरित्र, गुरुलिलामृत, साई सत्यवेध, गजानन विजय तसेच संत चरित्रांचे ग्रंथ वाचन केले जाते. नित्य नियमाने भोळ्या शंकराला प्रदक्षिणा घालून बेलपत्र, तुळसपान अर्पण केले जाते.
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी नगरीत प्रत्येक मंदिरात शिवलिंग स्थापित आहेत. सर्व मंदिर १६ व्या शतकातील असावेत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैजेश्वर हे पवनीतील शंकराचे सर्वात जुने मंदिर आहे. ऋषीपंचमी, महाशिवरात्री व श्रावणमासात मोठ्या संख्येने येथे भाविक येत असतात. मंदिराच्या प्रमुख वैशिष्टांमध्ये बेलाचे पान वैजेश्वर घाटावर विशिष्ट ठिकाणी अर्पण केले जाते. या घाटातील मंदिरात एकाच रांगेत १२ शिवलिंग स्थापित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे श्रावण मासात या मंदिराचे महत्व अजूनच वाढलेले आह. उद्या श्रावणमासाचा पहिला सोमवार असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)