भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

By Admin | Updated: May 21, 2015 00:46 IST2015-05-21T00:46:23+5:302015-05-21T00:46:23+5:30

जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते.

Shingada crop in paddy fields | भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

भंडारा : जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत पवनी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी भात खाचऱ्यामध्ये शिंगाडा लागवड करून पडिक राहणाऱ्या भात खाचऱ्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. येथे तलावांमध्ये मासे उत्पादनासोबतच येथील शेतकरी शिंगाड्याचे उत्पादनही घेतात. पवनी तालुक्यात ३४ हजार ६४२ हेक्टर एकूण पीक लागवडीखाील क्षेत्रापैकी ३८.२४ हेक्टर क्षेत्रावर शिंगाडा पीक घेण्यात येते. तालुक्यातील ढिवर-कहार जमातीचे सुमारे २५-३० शेतकरी शिंगाडा लागवड करतात. मात्र शास्त्रशुद्ध माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांचे उत्पादन कमी होत असे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत २०१३-१४ मध्ये पवनी येथे शिंगाडा शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना शिंगाडा पिक लागवडीसंदर्भात शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती देण्यात आली. सोबतच भातखाचऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी शिंगाडा पिक घ्यावे यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कृषि विभागाने २०१४-१५ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करून शिंगाडा लागवडीसाठी शेतकऱ्यांची निवड केली. यामध्ये कोटनापालार येथील पुंडलीक घ्यार, सुरज वाघमारे, सुदाम वाघधरे, भेंडाळा येथील रमेश मेंढे, विलास पारधी, रनाळा येथील हरिभाऊ घ्यार, रमेश दुधपचारे, हरीचंद्र दुधपचारे, संतोष दुधपचारे, शिरसाळा येथील श्रावण कांबळे, भोजापूर येथील रामाजी शेनमारे आणि पवनी येथील वंगणू शिवरकर या बारा शेतकऱ्यांच्या शेतावर शिंगाडा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर ६ शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना लागवड पद्धती, काढणी, तोडणी, तणाचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख, बाजार व्यवस्थापन इत्यादी माहिती देण्यात आली. धानाच्या लागवडीसाठी खाचरे करण्यात येतात. शेतातील उताराच्या भागातील खाचऱ्यांमध्ये जास्त पाणी जमा होते. त्यात धानाचे पिक बरोबर येत नसल्यामुळे तेवढा भाग पडीत राहतो. याच पडीत व उतारामधील भातखाचऱ्यांचा उपयोग शिंगाडा पिकासाठी करण्यात आला. यातून शेतकऱ्यांना ३५ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले असून ४० हजार रूपये नफा मिळाला आहे.
या बारा शेतकऱ्यांनी शिंगाड्याचे उत्पादन घेवून इतर शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. पुढील दोन वर्षात शिंगाडा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न कृषी विभाग व आत्मा मार्फत करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shingada crop in paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.