प्रतीक्षा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला
By Admin | Updated: May 8, 2014 23:32 IST2014-05-08T23:32:30+5:302014-05-08T23:32:30+5:30
मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार,

प्रतीक्षा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला
पाच लाखांपर्यंतच्या शर्यती
मोहाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ एक आठवडा शिल्लक आहे. कोण निवडून येणार, कुणाला पराभव पत्करावा लागणार, विदर्भासह राज्यात आणि देशात कोण किती जागा घेणार, कोणत्या पक्षाची सत्ता येणार याविषयी सर्वांनाच कमालिची उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेतूनच हजारांपासून लाखांपर्यंत तर एक कप चहापासून तर जेवनापर्यंत अनेकांनी शर्यती लावलेल्या आहेत. गाव-खेड्यापासून ते शहरापर्यंत चार-चौघांच्या बैठकीत चर्चा सुरु असते ती निवडणूक निकालाची. सगळ्यांनाच प्रतिक्षा लागली आहे, १६ मे च्या सकाळची. तथापि, मतदान झाल्यापासून भंडार्यातून ‘भाई’ येणार की ‘भाऊ’ येणार हीच चर्चा गावागावात होताना दिसत आहे. सगळेच आपापल्यापरीने अंदाज वर्तवित आहेत. बेरीज-वजाबाकी लाखावरुन हजारावर येणार असल्याचे काहींचे म्हणने आहे तर काहींना परिवर्तन होणार असे चर्चेतून दिसून आले आहे.
याशिवाय प्रमुख उमेदवाराची मते कोण किती काटणार याचाही हिशेब आकडेवारीसह सांगत आहेत. चर्चा, हिशेब, अंदाज वर्तविणे सुरु असते आणि त्यातूनच पुढे सरसावतात शर्यती लावण्यासाठी. त्यातच चढविणारे अनेक असल्यामुळे या शर्यतीचा आकडा वाढत जात आहे. शहरात लाखोच्या शर्यती सुरू आहेत तर ग्रामीण भागात कुवतीनुसार शर्यती लावणे सुरु आहे. खेड्यातही आर्थिक सुबत्तेने मजबूत असलेले व्यक्ती लाखांच्या शर्यती घेत आहेत. ज्यांच्याकडे काही नाही असे हजार, पाचशेवर समाधान मानत आहेत. पाच रुपयाची चहासुद्धा शर्यतीचा हिस्सा झाली आहे. शर्यत केवळ मतदारसंघाची मोठ्या प्रमाणात लावली जात आहे, असे नाही. देशात कोणाला किती जागा मिळतील, कोणता पक्ष सत्तेत येईल, कोण पडणार, कोण जिंकणार अशा देश पातळीवरील प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या उमेदवाराची चर्चा गावखेड्यात होत आहे. सत्ता परिवर्तन झाले तर येणारा पक्ष सामान्यांचे हित जोपासणार काय याचीही चिंता अनेकांना वाटू लागली आहे. काही ठिकाणी सफारी शिवून देण्याची शर्यती लागलेल्या आहेत. काही ठिकाणी दुचाकीच्या तर काही ठिकाणी म्हणशील त्या हॉटेलमध्ये भोजन करायला नेईन, अशा शर्यतींचाही समावेश आहे. विधानसभेच्या चर्चांना उधाण शर्यती आणि चर्चा यापलिकडे एक चर्चा सुरु आहे ती येणार्या विधानसभा निवडणुकीची. टिक-टिक थांबली तर कोणाला उमेदवारी दिली जाईल. अन् फुल कोमेजला तर कसं होणार, याची चिंताही मतदारांना वाटू लागली आहे. याला तिकीट मिळेल, याची उमेदवारी कापली जाणार, या मतदारसंघात सर्वाधिक समाज आहे, त्यालाच तिकीट मिळेल, असे तर्कवितर्क लावणे सुरू आहे. एक आठवडा निवडणुकीच्या निकालाला उरल्यामुळे तेवढ्याच गतीने चर्चा, चहापानाच्या बैठकी अधिकच रंगू लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)