नदीतून रेतीचा उपसा
By Admin | Updated: November 1, 2015 00:35 IST2015-11-01T00:35:47+5:302015-11-01T00:35:47+5:30
३० सप्टेंबरपासून रेती उपसा बंदचा आदेश असताना तालुक्यात रात्री तथा पहाटे नदीपात्रातून रेतीचा प्रचंड उपसा सुरु आहे.

नदीतून रेतीचा उपसा
कागदावर मात्र रेती उत्खनन बंद : महसूल प्रशासन हतबल की रेती तस्करांना अभय
मोहन भोयर तुमसर
३० सप्टेंबरपासून रेती उपसा बंदचा आदेश असताना तालुक्यात रात्री तथा पहाटे नदीपात्रातून रेतीचा प्रचंड उपसा सुरु आहे. महसूल प्रशासनाचे रेती तस्करांना येथे अभय असल्याचे दिसून येते.
कागदावर मात्र रेती उपसा बंद आहे, तर प्रत्यक्षात वेगळेच चित्र येथे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत डम्पींग केलेल्या रेतीला १५ दिवसाची उचल करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र येथे रेती उचल करण्याऐवजी नदीतून रेती उत्खनन केले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती घाटातून रेती उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. तालुक्यातील देवनारा, आष्टी, लोभी, चारगाव, तामसवाडी, बाम्हणी, सुकळी, वारपिंडकेपार, माडगी, पांजरा, उमरवाडा, चांदमारा, सक्करदरा, घानोड, मांडवी, सुकळी नकुल आदी गावात रेती घाट आहे. बावनथडी तथा वैनगंगा नदी खोऱ्यात उच्च दर्जाची रेती आहे. महसूल विभागाने १९७३ चे कलम १४४ अन्वये वैनगंगा व बावनथडी नदी पात्रापासून २०० मिटर परिसरात रेतीची उचल व वाहतूक करण्याची बंदी घातली आहे. परंतु हे केवळ कागदावर दिसत आहे. मध्यरात्री व पहाटे सर्रास रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरु आहे. दिवसा हा सर्व प्रकार बंद असतो. गावातील पोलीस पाटील तथा तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामसेवकांनी हा प्रकार तहसीलदारांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. तहसीलदारसह कर्मचारी केवळ बैठकांत व्यस्त दिसत आहे. तर दुसरीकडे तस्करांना रान मोकळे आहे.
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील देव्हाडा, घाटकुरोडा रेती घाटावर रेती व्यवसायीकांनी प्रचंड रेती साठा उपसा करून ठेवला होता. हा साठा सध्या उचल करणे सुरु आहे. गोंदिया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसाची मुदत दिल्याचे समजते. डम्पींग रेती साठा उचल करता करता रात्री नदीपात्रातून रेती उत्खनन करून पुन्हा रेती डम्पींग केली जात असल्याची माहिती आहे.
तुमसर मार्गे रेतीचे ट्रक नागपुरच्या दिशेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत आहेत. इतका रेती साठा डम्प करून ठेवला होता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोंदिया मुख्यालयाचे अंतर सुमारे ४५ कि.मी. असल्याने प्रशासकीय यंत्रणा येथे अनभिज्ञ दिसत आहे. यात महसुल विभागाचे लाखोंचे नुकसान होत असतानाही कारवाई शुन्य आहे.