‘शेप’ने घातला कोट्यवधींचा गंडा
By Admin | Updated: September 3, 2016 00:22 IST2016-09-03T00:22:50+5:302016-09-03T00:22:50+5:30
शेप महाबचतगटाच्या लाखनी शाखेमध्ये अभिकर्त्यांच्या माध्यमातून नियमित बचत खातेदार व सावधी ठवीचे ...

‘शेप’ने घातला कोट्यवधींचा गंडा
लाखनीत गुन्हा दाखल : मेश्राम यांना अटक करण्याची मागणी
लाखनी : शेप महाबचतगटाच्या लाखनी शाखेमध्ये अभिकर्त्यांच्या माध्यमातून नियमित बचत खातेदार व सावधी ठवीचे खातेदारांचे ३ कोटी १२ लाख रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार शेफ महाबचतगटाचे मुख्य प्रवर्तक मोरेश्वर मेश्राम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध अमित कुलसुंगे यांनी लाखनी पोलीस ठाण्यात केली आहे.
अमित कुलसुंगे हे लाखनी शाखेच्या शेप महाबचतगटाच्या प्रभारी व संयोजक पदावर मानधनावर कार्यरत होते. गैरअर्जदार मोरेश्वर मेश्राम, गौतम वरकडे, नंदलाल अंबादे, किरपान सयाम, लता इंदूरकर, रमेश मोहुर्ले, महेंद्र ठाकरे, सुनिल नंदमिरीवार, विवेक मंगर, सुनंदा मडावी, शमिना सय्यद हे शेप महाबचतगटच्या ज्या संस्थेद्वारे संचालित केले जाते त्या अभिनव अभिरुची कला व बहुउद्देशिय संस्थेचे पदाधिकारी आहेत. गैरअर्जदार प्रज्ञा मेश्राम, प्राजक्त मेश्राम, पियूश मेश्राम, प्रणोती मेश्राम हे शेप महाबचत गटाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पैशाची गुंतवणूक करीत तर गैरअर्जदार राहुल खंडारे हा बचतीच्या पैशाचा उपयोग शेप, एन्टरटेनमेंट प्रा.लि. मध्ये कार्यकारी निर्माता म्हणून करीत होता. २००५ मध्ये शेप महाबचतगटाची स्थापना करण्यात आली. शेप महाबचत गट भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात कार्यरत होत्या. यामहाबचत गटात संयोजक, शाखा व मुख्य व्यवस्थापकीय संचालक अशी साखळी निर्माण केली. कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खातेदाराकडून दरमहा ६० ते ४९९ रूपयापर्यंत आर.डी. वसुल केली जात असे. तसेच ५०० रुपये ते १० हजार रूपयांपर्यंत सावधी ठेवी शेप महाबचतगटाच्या मुख्य कार्यालयात जमा केले जायचे. या रकमेची विल्हेवाट मोरेश्वर मेश्राम लावत असत. मोरेश्वर मेश्राम हे शेप महाबचत गटाचे सर्वेसर्वा आहेत. महाबचत गटात लोकांनी पैसे गुंतवावे म्हणून चारही जिल्हे व त्यामधील संपूर्ण तालुके तसेच इतर मोठ्या शहरांमध्ये शेप महाबचत गटाचे शाखा कार्यालय सुरु केले होते. मेश्राम यांनी खातेदारांशी तोंडी करार करून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. दामदुप्पट लाभ व खातेदार एक बकरी संगोपन करेल व साठ रूपये दरमहा गुंतवणूक करेल त्याला साडेसात वर्षात ५० हजार रूपयांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. मेश्राम यांनी व्यावसायिक कंपन्या स्थापन करून बचतीचा पैसा वळता केला. मेश्राम यांनी गणेशपूर, धारगाव, आलेसूर, खैरी, पानोड, झाडगाव व इतर विविध ठिकाणी स्थावर व जंगम मालमत्ता विकत घेऊन पैशाची गुंतवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा सिद्ध झाल्यावर मेश्राम यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल.
- चंद्रशेखर चकाटे,
पोलीस निरिक्षक, लाखनी.