शेप महाबचत गटाने केला २.८ कोटी रूपयांचा अपहार
By Admin | Updated: September 14, 2016 00:32 IST2016-09-14T00:32:32+5:302016-09-14T00:32:32+5:30
शेप महाबचतगटाच्या माध्यमातून भंडारा येथील मोरेश्वर मेश्राम यांच्यासह १५ जणांनी कोट्यवधी रूपयांचा अपहार करून फसवणूक केली.

शेप महाबचत गटाने केला २.८ कोटी रूपयांचा अपहार
साकोलीत तक्रार : मेश्रामला अटक करण्याची मागणी
साकोली : शेप महाबचतगटाच्या माध्यमातून भंडारा येथील मोरेश्वर मेश्राम यांच्यासह १५ जणांनी कोट्यवधी रूपयांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, या आशयाची तक्रार कुंभली येथील किशोर रंगारी यांच्यासह ३३ जणांनी साकोली पोलीस ठाण्यात केली आहे.
शेप महाबचतगटाच्या साकोली शाखेमध्ये आपण प्रभारी पदावर मानधनावर कार्यरत होतो. २५ मार्च १९९८ रोजी ११ जणांनी मिळून अभिनय अभिरुची कला व बहुउद्देशिय संस्था गडचिरोली ही सामाजिक सहकारी संस्था स्थापन केली. यात शेप महाबचतगट भंडारा, गोंदिया, नागपूर गडचिरोली त्यात्या जिल्ह्यात कार्यरत होती. या महाबचत गटात संयोजक शाखा प्रभारी, संपर्क अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, व्यवस्थापक, मुख्य प्रवर्तक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक अशी साखळी होती. त्यानुसार खातेदारांकडून दरमहा ६० रुपये ते ४९९ रूपये व ५०० ते १० हजार पर्यंत ठेवीच्या माध्यमातून एक हजार ते त्यावरील पैसे जमा करुन शेप महाबचत गटाच्या भंडारा येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यात येत होती. त्यानंतर ही रक्कम शेप महाबचत गटाचे मुख्य प्रवर्तक मोरेश्वर मेश्राम यांच्या खात्यात जमा होत होती.
मेश्राम हे शेप महाबचतगटाचे सर्वेसर्वा असुन त्यांनी शेप महाबचतगटात चारही जिल्ह्यात शाखा कार्यालये सुरु केले. शेपमहाबचतगटाच्या माध्यमातून जमा झालेला पैसा व्यावसायिक कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधून मिळणाऱ्या नफ्याच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे लाभासह परत करू, असे मेश्राम यांनी सांगितले होते. त्यानंतर मेश्राम यांनीशेप इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमि., शेप अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड मार्केटिंग प्रा. लि., एस. व्हीजन प्रायवेट लिमी. शेप प्रिंटींग अॅण्ड पब्लिकेशन प्राय. लिमि. या खाजगी कंपन्या स्थापन केल्या. या पैशातून गणेशपूर, धारगाव, आकेश्वर, खैरी, घानोड, झाडगांव या ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. ठेवीची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे मागितले असता टाळाटाळ सुरू करून मेश्राम हे फरार झाल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. साकोली शाखेमधून २ कोटी ८ लाख १८ हजार ६८० रूपयांच्या ठेवीच्या रकमेचा अपहार झाला आहे. यामुळे मोरेश्वर मेश्राम यांच्यासह गडचिरोली येथील १५ जणांचा तक्रारीत समावेश आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून या सर्वांना अटक करून खातेदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी किशोर रंगारी यांच्यासह ३८ जणांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)