कोरड्या दुष्काळाची छाया
By Admin | Updated: August 27, 2014 23:18 IST2014-08-27T23:18:44+5:302014-08-27T23:18:44+5:30
आकाशात ढग दाटले की शेतकरी आकाशाकडे हात जोडून वरुणराजाला विणवणी करतो. परंतु पाऊस पडत नही. मागीलवर्षी अतिवृष्टीने हतबल शेतकरी यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या सावटात अडकला आहे.

कोरड्या दुष्काळाची छाया
बारव्हा : आकाशात ढग दाटले की शेतकरी आकाशाकडे हात जोडून वरुणराजाला विणवणी करतो. परंतु पाऊस पडत नही. मागीलवर्षी अतिवृष्टीने हतबल शेतकरी यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या सावटात अडकला आहे.
मागीलवर्षी अतिवृष्टी झाली. त्यापूर्वी दोन वर्षे पाऊस कमी पडला होता. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे उत्पादनात घट झाली. कसेबसे हाती आलेल्या उत्पन्नाला सरकारनेही योग्य दर दिला नाही. त्यामुळे शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात येत आहे. शेतकऱ्यांना एखाद्या जोडधंद्याचा आधार घ्यावा लागत आहे. केवळ शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे त्यांना अशक्य झाले आहे.
पुढील वर्ष भरघोस उत्पन्नाचे येईल या भाबड्या आशेने बळीराजा शेतात आपला व आपल्या कुटुंबाचा घाम गाळतच आहे. सुरुवातीच्या नक्षत्रांनी दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार नव्हे तर तिबार पेरणी करावी लागली. त्यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. बियाण्यांची धावाधाव करावी लागली. एकदाची पावसाने उशिरा हजेरी लावली अन् त्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. मात्र पावसाने पुन्हा हुलकावणी दिली अन् आता शेतकऱ्यांचा जीवच टांगणीला लागला आहे. जुलै आॅगस्ट महिन्यात शेतात सर्वत्र हिरवी पिके डौलाने उभे दिसतात. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे पिके आता कोमेजू लागली आहे. पिकांची मशागत करून खत देऊन शेतकरी पावसाची वाट बघत आहे. मात्र वरुण राजा चांगलाच रुसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानपिके आता धोक्यात सापडली आहे. धानपिकाची दशा बघून बळीराजाही मनातून कुठत आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. पावसाचे दोन महिने उलटले तरीही शेतातील पिके डोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे. परिणामी बळीराजाच्या जीवनातील आशाच कोरड्या पडत आहे. यावर्षी कुटुंबाचा गाडा कसा ओढावा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)