लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : एका अल्पवयीन मुलीचा लपून बालविवाह करण्यात आला. मुलगी सात महिन्यांची गर्भवती असताना या बालविवाहाचा भंडाफोड झाला. हा प्रकार करडी पोलीस ठाणे हद्दीत घडला असून तक्रारीवरुन पोलिसांनी मुलीच्या आईवडीलासह पती व सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश शालीकराम शेंद्रे, त्यांची पत्नी गीता व अल्पवयीन मुलगा असे आरोपींचे नाव आहे. शेंद्रे कुटुंबीय साकोली तालुक्यातील खांबा (जांभळी) येथील रहिवासी असून सध्या ते करडी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात राहत होते. काही महिन्यांपूर्वी प्रकाश शेंद्रे यांच्या मुलाचे लग्न अल्पवयीन मुलीसोबत लावण्यात आले.
यात पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली. सात महिन्यांची गर्भवती असताना प्रकरण समोर आले. या प्रकरणात पिडीत मुलगी गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असल्याने हे प्रकरण सदर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवरदेवही अल्पवयीनमोहाडी तालुक्यातील ज्या नवरदेवासोबत अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले तो मुलगाही अल्पवयीन आहे. त्याचे वय १७ इतके पोलिसात नोंद आहे. दोघांचेही वय लग्नायोग्य नसतानाही दोन्ही गटाकडील मंडळींनी लग्नाला होकार देत त्यांचे लग्नही लावून दिले.