माविमंच्या समन्वयातून मिळाला सात कोटींचा लाभ

By Admin | Updated: July 8, 2014 23:17 IST2014-07-08T23:17:45+5:302014-07-08T23:17:45+5:30

एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रथा महिला आर्थिक विकास महामंडळाची कॅचलाईन या प्रमाणे काम करीत माविमंने यावर्षी सर्व विभागांच्या समन्वयातून ७ कोटी ४५ लक्ष रुपये विविध योजनांच्या

Seven crore profit from the conglomerate of Maoim | माविमंच्या समन्वयातून मिळाला सात कोटींचा लाभ

माविमंच्या समन्वयातून मिळाला सात कोटींचा लाभ

भंडारा : एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रथा महिला आर्थिक विकास महामंडळाची कॅचलाईन या प्रमाणे काम करीत माविमंने यावर्षी सर्व विभागांच्या समन्वयातून ७ कोटी ४५ लक्ष रुपये विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत पोहचविले.
यामध्ये सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना असून शहर व ग्रामीण भागातील ६ हजार २२४ महिला लाभार्थी ठरल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ राज्यात महिला विकासाचे कार्यक्रम राबविण्यासाठी शिखर संस्था म्हणून काम करते.
स्वयंसहाय्य बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या विकासात्मक योजनांची अंमलबजावणी गत १५ वर्षांपासून माविमं अंतर्गत करण्यात येत आहे. राज्यात तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान या तीन महत्वाच्या योजना माविमं मोठ्या प्रमाणावर राबवित आहे.
जिल्ह्यात ३०० गावांमध्ये माविमंचे १७५३ बचत गट असून यामध्ये २१ हजार ९०० महिलांचा सहभाग आहे. सन २०१३ या वर्षात कृती संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६ हजार २२४ महिलांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ माविमंने मिळवून दिला. बचत गटाच्या माध्यमातून काही अभिनव कामे सुद्धा केली आहेत. जिल्ह्यातील जंगलावर आधारित रोजगार निर्मितीसाठी माविमंने पुढाकार घेतला.
टसर सिल्क आणि लाख निर्मिती यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहित करून आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून दिली. याचा परिणाम म्हणजे मोहाडी तालुक्यातील सितेपार गावातील अंकुर बचत गटाने स्वत: टसर कोसाचे उत्पादन करून धागा निर्मिती केली आहे. आता कापड निर्मितीच्या दिशेने हा गट काम करतो. या बचत गटाच्या कामाची दखल विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनीही घेतली आहे. यासाठी माविमंने रेशीम विभाग, वनविभाग आणि आत्मा यांच्याकडून प्रशिक्षण, बीज आणि साधन सामुग्रीसाठी सहाय्य घेतले. साकोली तालुक्यातील धारगाव येथे दूध संकलन करणाऱ्या महिलांचा गट तयार केला.
दूध उत्पादन वाढविण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात ११८ गायींचे वाटप करण्यात आले. त्यासाठी वनविभागाने २३ लक्ष ६० हजार रुपये अनुदान दिले. आत्माने दूध वाढविण्यासाठी अ‍ॅझोला लागवड प्रशिक्षण व साहित्य दिले. माविमंने विविध विभागाच्या समन्वयातून महिलांपर्यंत लाभ पोहचविला. त्यामध्ये आत्मा कडून टसर व लागवड बीज भांडवल, अ‍ॅझोला लागवड, भाजीपाला लागवड करण्यासाठी बियाणे, खते अशा प्रकारे १० लक्ष ३४ हजार रुपये उपलब्ध करून दिले. रेशीम विभागाने ४७ महिलांना रिलींग मशीन, साहित्य आणि प्रशिक्षणासाठी १ लक्ष रुपये दिले.
वनविभागाकडून २२१ महिलांसाठी ११८ महिलांना गायी, ५३ महिलांना गॅस जोडणी तर ५० महिलांना नर्सरी लागवडीसाठी असे एकूण २४ लक्ष ९४ हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून वितरीत केले.
कृषी विभागाने बियाणे, खते आणि कृषी साहित्य खरेदीसाठी २२ लक्ष ९४ हजार रुपये महिलांसाठी खर्च केले. याचा लाभ १ हजार १७१ महिलांनी घेतला. माविमंच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर यांनी विविध विभागांशी समन्वय साधून दारिद्र्यरेषेखालील १६३ महिलांना घरकुल देखील उपलब्ध करून दिला. त्यासाठी १ कोटी ५७ लक्ष ५० हजार इतकी रक्कम महिलांना वितरीत केली. याशिवाय समाजकल्याण विभागामार्फत ८६ महिला बचत गटांना विविध ट्रॅक्टर देण्यात आले. यामुळे महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
१४ गरजू महिलांना सायकल मिळवून देण्यासाठी माविमंने पुढाकार घेतला. ग्रामोद्योग महामंडळाकडून १५ महिलांना रोजगारासाठी व्यक्तिगत कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर जननी सुरक्षा योजना, सिकलसेल, रुग्णतपासणी, चष्मे वाटप या योजनांचा लाभही तळागाळातील गरजू महिलांपर्यंत पोहचविला आहे. माविमंने अनेक विभागांकडे असलेल्या योजनांचा समन्वय साधून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे काम उभे करण्यात महत्वाचा हातभार लावला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Seven crore profit from the conglomerate of Maoim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.