खूनप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

By Admin | Updated: May 6, 2017 00:18 IST2017-05-06T00:18:23+5:302017-05-06T00:18:23+5:30

३ महिन्यांपूर्वी भिलेवाडा शेतशिवारात झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे ....

Sentenced to life imprisonment for the murder of the accused | खूनप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

खूनप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : दोन वर्षांपूर्वी भिलेवाडा येथे गुरे चराईसाठी गेलेल्या महिलेचा झाला होता खून
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : २३ महिन्यांपूर्वी भिलेवाडा शेतशिवारात झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपीला सश्रम आजीवन कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. राकेश अज्ञान राखडे (३३) रा.भिलेवाडा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
२३ जून २०१५ रोजी शालू राजू वाढई रा.भिलेवाडा ही महिला शेतशिवारात शेळी चराईसाठी गेली होती. सायंकाळ होऊनही शालू घरी न परतल्याने तिचा पती राजू वाढई हा तिच्या शोधार्थ शेताकडे गेला. परंतु तिचा शोध लागला नाही. घरी परत येऊन राजू हा त्याचा मोठा मुलगा अनिकेतसोबत दुचाकीने शेतशिवारात गेले. यावेळी शोध घेतला असता रामभाऊ खोब्रागडे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाजवळ शालू रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आली. गंभीर जखमामुळे तिचा मृत्यू झाला होता. याची माहिती राजूने भिलेवाडा येथील पोलिस पाटील यांना दिली.
पोलीस नायक भुसावळे यांच्या तक्रारीवरून व फिर्यादी राजू वाढई यांच्या माहितीवरून कारधा पोलिसांनी राकेश राखडे याच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३९४, २०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासाची सूत्रे फिरवित राकेश राखडे याला अटक केली होती.
त्यानंतर कारधा पोलिसांनी प्रकरण भंडारा न्यायालयात दाखल केले. यात घटनेच्या दिवशी राकेश राखडे याने चोरीच्या उद्देशाने शालुवर लोखंडी फावड्याने प्रहार केला. तसेच सोन्याचे दागिणे घेऊन घटनास्थळाहून पळ काढला होता. गंभीर जखमी झाल्याने शालुचा मृत्यू झाला.
जिल्हा न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी शुक्रवारी परिस्थतीजन्य पुरावे, दोन्ही पक्षांकडील बयाण व अन्य कारणे लक्षात घेऊन राकेश राखडेला शालुच्या खुनप्रकरणी भादंविच्या ३०२ कलमान्वये सश्रम आजीवन कारावास तथा तीन हजार दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. याशिवाय चोरीच्या इराद्याने मारहाण केल्याप्रकरणी भादंविच्या ३९४ कलामान्वये दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
कारधा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगोले यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक विनोद रहांगडाले, हेड कॉन्स्टेबल रमेश ढेंगे, सिताराम ब्राम्हणकर, पोलिस कॉन्स्टेबल सुशिलकुमार सोनवाने यांनी या घटनेचा तपास केला होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. आर. एन. खत्री यांनी तर बचाव पक्षातर्फे यु.के. खटी यांनी युक्तीवाद केला.

Web Title: Sentenced to life imprisonment for the murder of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.