ज्येष्ठ नागरिक मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या विळख्यात
By Admin | Updated: September 30, 2014 23:32 IST2014-09-30T23:32:43+5:302014-09-30T23:32:43+5:30
आयुष्यमान वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्येतही वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात १२ हजार ६८४ महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांनी उपचार घेतले.

ज्येष्ठ नागरिक मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या विळख्यात
भंडारा : आयुष्यमान वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्येतही वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात १२ हजार ६८४ महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांनी उपचार घेतले. ज्येष्ठांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार मोठ्या प्रमाणात असल्याचे निस्पन्न झाले आहे. ज्येष्ठ नागरिक स्तन कँसरग्रस्त असल्याचेही निदानातुन स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी आज (दि.३०) आयोजित पत्रपरिषदेत दिली.
डॉ. पातुरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत माहिती देताना पुढे सांगितले की, १ आॅक्टोंबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन जिल्हा सामान्य रूग्णालयात साजरा करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संख्येनुसार दर दहा व्यक्तीमागे एक व्यक्ती ६० वर्षावरील आहे. वाढलेल्या आयुर्मानासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्येही वाढ होत आहे. त्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, मोतीबिंदू, काचबिंदू, मानसिक आजार यांचे निदान व उपचार केल्या जात आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत बाह्य रूग्ण विभागात ३७ हजार ८१५ ज्येष्ठ नागरिकांवर उपचार करण्यात आले. त्यात १९ हजार ३४३ पुरूष तर १८ हजार ४७२ महिलांचा समावेश आहे. आॅगस्ट महिन्यात १२ हजार ६८४ ज्येष्ठांवर औषधोपचार करण्यात आला. त्यात ६ हजार ४३ ज्येष्ठ पुरूषांवर तर ६ हजार ६४१ ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार व पक्षाघाताने ग्रस्त ४ हजार १२९ ज्येष्ठांवर आॅगस्टपर्यत उपचार करण्यात आले. त्यातील आॅगस्ट या महिन्यात ९४४ रूग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती यावेळी डॉ. पातुरकर यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)