ज्येष्ठ नागरिक हितकारी कायदा होणे गरजेचे
By Admin | Updated: October 9, 2016 01:18 IST2016-10-09T01:18:42+5:302016-10-09T01:18:42+5:30
ज्येष्ठांनी राबविलेला हा उपक्रम प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे. या सत्कार सोहळ्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल यात काही शंका नाही.

ज्येष्ठ नागरिक हितकारी कायदा होणे गरजेचे
विलास श्रृंगारपवार यांचे प्रतिपादन : १० समाजसेवी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
अड्याळ : ज्येष्ठांनी राबविलेला हा उपक्रम प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे. या सत्कार सोहळ्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल यात काही शंका नाही. परंतु आजच्या ज्येष्ठांच्या समस्येत खूप वाढ आली आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक हितकारी कायदा बनने ही काळाची गरज आहे. असे मत माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांनी व्यक्त केले.
वैनगंगा मानवता सेवा संघ, स्नेही मित्र मंडळ लाखनी व अड्याळ ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील समाजसेवी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा अड्याळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार व प्रमुख वक्ते म्हणून वि.सा.संघ नागपूरचे उपाध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल, मुख्य उपस्थिती म्हणून वैनगंगा मानवता सेवा संघाचे अध्यक्ष. बे.तु. आगाशे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ. राजन जयस्वाल यांनी, भारतीय संस्कृतीत कार्यक्रमाला महत्व आहे. एक ते २५ वर्षे ब्रम्हचर्य, २५ ते ५० गृहस्थाश्रम, ५० ते ७५ वर्षे वानप्रस्थाश्रम त्यानंतर ७५ ते १०० वयात सन्यास अशा या स्थिती आहेत. म्हातारपण आले असले तरी जीवनासक्ती संपलेली नसते. पोष्टासाठी पत्ता एकच असला तरी युनिट मात्र दोन दिसतात. मुलगा, सुन आणि त्यांची मुलं हे एक बेट व आजी, आजोबा हा दुसरा बेट कधी यात अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांचाही समावेश असतो. असे प्रतिपादन डॉ. जायस्वाल यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात समाजात उत्कृष्ट कर्तव्य पार पाडणारे ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. त्यात अड्याळ येथील गावाचा आत्मा, मसिहा अशा विविध नावांनी ओळखले जाणारे डॉ. भय्याजी क्षीरसागर, वनमाली वसानी, भास्कर पोटवार अशा त्रिमूर्तीचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच हरिभाऊ बरडे तुमसर, साधुराव बडवाईक साकोली, डॉ.धनंजय भिमटे लाखनी, श्रावण दखणे मडेघाट, आनंदराव पराते मोहाडी, श्रीराम राऊत भूगाव पंढरपूर अशा १० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा यावेळी मोठ्या थाटात पार पाडला. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी अड्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व जागृती बहुउद्देशिय शिक्षक व क्रीडा समितीचे सचिव राजू रोहणकर व त्यांचे मित्र परिवार यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक आगाशे यांनी केले. तर आभार ए.पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमाअंती सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)