गरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री
By Admin | Updated: October 28, 2014 22:51 IST2014-10-28T22:51:26+5:302014-10-28T22:51:26+5:30
गरिबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर योजना आखण्यात येतात. असे असले तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अयोग्य पद्धतीने वाटप होत असल्यामुळे

गरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री
लाखांदुरात पकडले होते रॅकेट : अन्न पुरवठा विभाग बनले मूकदर्शक
लाखांदूर : गरिबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर योजना आखण्यात येतात. असे असले तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अयोग्य पद्धतीने वाटप होत असल्यामुळे गरीबांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय धान्य दुकानातील हे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही याकडे अन्न पुरवठा विभागाचे लक्ष गेलेले नाही. मागीलवर्षी भंडारा शहरात एका धान्य दुकानावर धाड टाकून धान्य जप्त केले होते, परंतु त्यानंतर कुठलिही कारवाई करण्यात आली नाही.
बीपीएलधारकांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार मिळतो. मात्र अन्न पुरवठा विभागाचा गाफिलपणा तसेच काळ्या बाजारातील दलालांशी असलेले साटेलोटे यात गरिबांचा जीव गुदमरत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय गोदामातून धान्याची उचल करण्यापासून ते परमीट पास करण्यापर्यंत अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेले आर्थिक शोषण अंत्योदयधारकांच्या जीवावर उठले आहे.
अन्न पुरवठा विभागाचे अन्न वाटपाचे नियोजन कोलमडल्यामुळे त्याचा फायदा स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. परमीट पास केल्यानंतर धान्य उचल ते शिधापत्रिकाधारकांना धान्य प्रमाणात मिळते का? उचल केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचते का? गोदामात शिल्लक साठा व वाटप साठा याची दर महिन्यात तपासणी केली जाते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धान्याची उचल केल्यानंतर दोन दिवसात पैशाअभावी उशिरा उचल केले तर धान्य दुकानदार धान्य संपले, असे सांगून धान्य वाटप बंद करतात. शासकीय गोदामातूनच खऱ्या अर्थाने धान्याची मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याचे यापूर्वी गोदाम रक्षकांकडून रंगेहात पकडून लाखांदुरात रॅकेट उघडकीस आणले होते. सरपंच व दक्षता समितीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. चौकशी केली तर साठा व वाटप यात ताळमेळ बसत नाही. यामुळेच स्वस्त धान्य दुकानदारांचे चांगलेच फावत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असूनही कारवाई होत नाही. गरीबांना केरोसीनची नितांत गरज असते. मात्र केरोसीन विक्रेते प्रवाशीवाहनांना जादा दराने केरोसीन विकत असल्याने गरजूंना शिधापत्रिका दाखवूनही केरोसीन स्टॉक संपले असल्याचे सांगितले जाते.
परजिल्ह्यात धान्याची विल्हेवाट
येथील धान्य बाजार समिती दलालामार्फत पोहचते केले जाते. यासाठी काही अडते याचा फायदा घेतात. काही दलाल धान्याचे दर घटले किंवा वाढले तर अर्जुनी मोर येथे पाठवून खुलेआम धान्याची अफरातफर करतात. यासंबंधी अनेकदा तक्रारी केल्यावर मुद्देमालासह धान्यही पकडले. मात्र अन्न पुरवठा विभागाने मौन पाडल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)