महामार्गावरील ढाब्यांवर २४ तास दारूविक्री
By Admin | Updated: August 5, 2016 00:45 IST2016-08-05T00:45:59+5:302016-08-05T00:45:59+5:30
साकोलीवरून नागपूर-रायपूर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर शहरापासून डावी व उजवीकडे अशा दोन्ही बाजुने मागे आणि पुढे ढाबे आहेत.

महामार्गावरील ढाब्यांवर २४ तास दारूविक्री
साकोली : साकोलीवरून नागपूर-रायपूर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर शहरापासून डावी व उजवीकडे अशा दोन्ही बाजुने मागे आणि पुढे ढाबे आहेत. परंतु या ढाब्यावर २४ तास दारूविक्री होत आहे. परिणामी हे ढाबे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहे. मात्र पेट्रोलींग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ढाबेमालकांनी नियम धाब्यावर बसविले. तालुक्यातील दारूबंदीची गावे देखील नामधारी असून साकोली तालुक्यासह शहरालाही वाली कुणीच नाही, अशी परिस्थिती दिसून येते.
महामार्गावरील ढाबा चालकावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने त्यांची हिंमत अधिकच बळावली आहे. शहरातील तरूणाईसुद्धा शहराबाहेरील ढाब्यावर दस्तक देत मनसोक्त दारू पितात. ढाबेचालकांना पोलिसांचे अभय असल्याचे यावरून स्पष्ट होते. ढाबा दारू दुकाने व हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी व शासकीय आदेश आहेत. मध्यरात्रीनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येथे येत असल्याचे बोलले जाते. याच दुकानावर गुन्हेगाराकडून अनेक कटकारखाने रचली जातात. शहरात होणारे खून व गुन्हेगारीच्या घटना पाहता बाहेर खून करून आणून फेकलेले प्रेत, चोऱ्या भंगार, घरफोड्या करणारे गुन्हेगारीचे ही दुकाने व ढाबे आश्रयस्थान बनले आहेत. साकोली सेंदुरवाफा या गावादरम्यान अनेक जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल अहेत. या हॉटेलमध्ये दारू पिण्यास सक्त मनाई आहे, असे ठळकपणे लिहीलेले असते. मात्र लिहीलेले हे केवळ लिहिण्यापुरतेच आहे. उलट येथे जास्त दारू ढोसली जाते. येथे सर्व काही खुलेआम सुरू असतात. कुणीही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची हिम्मत दाखविली नाही. रस्त्यावरील दुकाने पोलीस ठाणाच्या हाकेच्या अंतरावर आहेत, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)