तीन युवा परिचारिकांची वर्षभरापासून निस्वार्थ रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST2021-05-12T04:36:16+5:302021-05-12T04:36:16+5:30
मोहन भोयर तुमसर : कोरोनाचा कहर व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अधिकचा ताण आला आहे. अशा संकट प्रसंगी ...

तीन युवा परिचारिकांची वर्षभरापासून निस्वार्थ रुग्णसेवा
मोहन भोयर
तुमसर : कोरोनाचा कहर व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अधिकचा ताण आला आहे. अशा संकट प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तीन युवा परिचारिका एक वर्षापासून विनामूल्य रुग्णसेवा करीत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्याची जिद्द त्यांच्यात असून त्यावर विजय नक्कीच प्राप्त करू असा दृढ आत्मविश्वास त्यांना आहे.
कांचन साकुरे, पल्लवी रहांगडाले व रागिनी सिंदपुरे अशी सेवाभावी परिचारिकांची नावे आहेत. एक वर्षापासून कोणतेही मानधन न घेता रुग्णांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. कोरोना संक्रमण काळात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात कोरोना संक्रमित रुग्ण व इतर आजारांच्या रुग्णांचाही समावेश आहे. रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी व रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर कामाचा ताण अधिकच वाढला आहे. वर्षभरापासून रुग्णालय प्रशासन २४ तास रुग्णसेवा करीत आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून या तिघी रुग्ण सेवेसाठी पुढे आल्या.
तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्याची माहिती होत त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी
परिचारिकेचे प्रशिक्षण घेतले असून अशा संकटात आपली सेवा द्यायला पाहिजे असे या तिन्ही मैत्रिणीने निश्चित केले. त्यांना कोणतेही शासन, प्रशासनाकडून मानधन मिळत नाहीत. दररोज आपली रुग्ण सेवा अविरत सुरू ठेवली आहे. कोरोना संक्रमण काळात अधिक धोका असल्यामुळे अनेक जण रुग्णालयाकडे फिरकत नाही. परंतु रुग्णसेवेचे आम्ही व्रत स्वीकारले असून परिचारिकेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा करणे हा आमचा धर्म आहे असे त्या सांगतात.
या तिन्ही युवा परिचारिकांची उडान संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी भुरे, उडान संस्थेचे युवा संयोजक अर्पित जयस्वाल व इतर सदस्यांनी त्यांची उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. यासंदर्भात त्यांनी युवा परिचारिकांचे निःस्वार्थ रुग्णसेवा बघून देवदूताची आठवण झाली. या युवा परिचारिकांच्या कामाची शासनाने तत्काळ दखल घेऊन त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे उडान संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी भुरे यांनी सांगितले.