आशांची निवड ऐरणीवर
By Admin | Updated: August 4, 2015 00:28 IST2015-08-04T00:28:48+5:302015-08-04T00:28:48+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका निवडण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते

आशांची निवड ऐरणीवर
ग्रामसभेत वादंग : दोन वर्षांपासून निवड प्रक्रिया रखडली, पोलिसांना केले पाचारण
अड्याळ : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका निवडण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात वादंग निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यामुळे या सभेत आशा नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा एकदा रखडली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राज्यातील आदिवासी बहुल १५ जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २००८ पासून ही सेवा राज्यातील संपूर्ण जिल्हयातील बिगर आदिवासी भागातही ही योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. ही निवड गुण, कौशल्य, शिक्षण आदी बरोबरच ग्रामसभेवर अवलंबून आहे.
अड्याळ येथील काही वॉर्डातील आशा सेविकांची निवड प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. ग्रामसभेतून आशाची निवड करण्याचे आदेश आहेत. येथील काही ग्रामस्थांमध्ये वाद असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. आशा सेविकांची निवड करण्याच्या दृष्टीने ग्रामसभेने सभेचे आयोजन केले. मात्र, आशा निवडीवरून वादंग झाल्याने सभा बंद करण्यात आली. यापूर्वी पहिली सभा १५ आॅगस्ट २०१४, दुसरी सभा १० डिसेंबर २०१४ आणि तिसरी सभा ३१ जुलै २०१५ रोजी झाल्या. या तिन्ही सभेत आशा सेविकांची निराशाच झाली. सभेतील वाद विकोपाला गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
हजार लोकसंख्येच्या मागे एक आशा सेविका असा शासनाचे निर्देश आहे. गावातील अथवा वॉर्डातील एकही गरोदर माता व बालकाचा मृत्यू होऊ नये, प्रसूती शासकीय रुग्णालयातच करावी, ग्रामस्थांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, यासाठी आशाची निवड केली जाते. मात्र याच निवडीवर वाद होतात. आशाची निवड न झाल्याने निराशाच झाली असे आता बोलले जात आहे. (वार्ताहर)
ज्या उमेदवाराला गुण, शिक्षण, कौशल्य इत्यादीमुळे जास्त गुण प्राप्त झाले आहेत. त्याला ग्रामसभेत मंजुरी देणे अनिवार्य आहे. ही पदे रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामस्थांची राहील.
- एस. ए. नागदेवे,
ग्रामविकास अधिकारी, अड्याळ