प्रतीक्षा बघता बघता रात्र झाली

By Admin | Updated: July 5, 2014 23:25 IST2014-07-05T23:25:21+5:302014-07-05T23:25:21+5:30

सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम मोहाडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले येणार होते. त्यांची प्रतीक्षा बघता-बघता रात्र झाली.

Seeing the waiting, the night passed | प्रतीक्षा बघता बघता रात्र झाली

प्रतीक्षा बघता बघता रात्र झाली

सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक सत्कार : खासदार आलेच नाही
मोहाडी : सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम मोहाडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले येणार होते. त्यांची प्रतीक्षा बघता-बघता रात्र झाली. पण खासदार आलेच नाही. आठ तासापासून विलंबलेला सत्काराचा कार्यक्रम औपचारिकतेने संपविण्यात आला. तथापि या कार्यक्रमाला उदासिनतेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले होते.
मोहाडीत पहिल्यांदाच शिक्षक संघटना, शिक्षण विभाग यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक खाजगी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्य सत्कार गटशिक्षणाधिकारी माधव फसाटे यांचा होता. बीईओ पदावरुन माधव फसाटे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाला खासदार यावेत असा आग्रह सभापती वीणा झंझाड यांनी धरला होता.
खासदार यावेत म्हणून एक दिवस कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. एका आठवड्यात एवढा मोठा कार्यक्रम शिक्षकांनी आयोजित केला. खासदार म्हणून प्रथमच नाना पटोले येत आहेत याचा आनंद सगळ्यांच्या मनात होता. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक, शिक्षक संघटनेचे नेते, शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उत्साहाला सीमा राहिली नव्हती. शिक्षकांसाठी मधुर गीतांचा सुगम संगीत कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच कार्यक्रमामध्ये कोणतीही कमी राहू नये याबाबत सर्व काळजी संयोजकांनी घेतली होती. दोन वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
साधारणत: खासदार नाना पटोले ४ वाजता येणार असे सगळ्यांनाच सांगण्यात आले होते. घडीचा काटा पुढे सरकत होता. आता येणार, नंतर येणार असे सहा वाजले. एक-एक करुन शिक्षकांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. सात वाजता अर्ध्यापेक्षा जास्त खुच्या रिकाम्या दिसत होत्या. व्यासपीठावर मात्र खासदार नाना पटोले सोडून इतर निमंत्रित व्यक्ती ठाण मांडून बसली होती. त्यांच्या कपाळावरही उदासीनतेची छटा दिसत होती.. आठ वाजले पण खासदाराचे मोहाडीत आगमन झाले नाही. शेवटी माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, जि.प.चे उपाध्यक्ष रमेश पारधी यांच्या मुख्य उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आटोपता घेण्यात आला.जनतेचे प्रतिनिधींची व्यस्तता, लोकांची गाऱ्हाणी निपटवता निपटवता लागणारा वेळ, वेगवेगळ्या बैठका यातून सुटता सुटेना अशी अवस्था जनतेच्या प्रतिनिधींची होते. हिच अवस्था नाना पटोलेंच्या बाबतीत झाले. मोहाडीला ते का आले नाही याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती काढली. दक्षता समितीची बैठक, पुनर्वसन कार्यक्रमाचा आढावा, राईस मिल असोसिएशन संघ कडून सत्काराचा कार्यक्रम, राजस्थानी भवनात असणारा एक कार्यक्रम या सर्व कामांचा निपटारा करता करता खासदार पटोले यांना भंडाऱ्यातून रात्रीपर्यंत निघता आले नाही असे माहीत झाले. त्यामुळे मोहाडीच्या कार्यक्रमाला ते हजर राहू शकले नसल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. एका मुख्य पाहुण्याच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमात येणाऱ्यांचा, संयोजन करणाऱ्यांचा, सत्कार घेणाऱ्यांचा कसा हिरमोड झाला, कार्यक्रमात कशी उदासिनता पोहचते हे दिसून आले. सात तासापासून चालत आलेला कार्यक्रम निरुत्साहात संपला. पण हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या शिक्षकांचा व इतरांची एकच प्रतिक्रिया होती, एवढा खर्च केला खासदारांनी किमान अर्धा तास तरी द्यायला पाहिजे होता. आमचा वेळ, पैसा असाच वाया गेल्याची नाराजी शिक्षकांमध्ये दिसून येत होती. पुढच्या वर्षीचा असा कार्यक्रम घ्यायचं का हा विचार करु अशी भावनाही शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. पहिल्यांदाच उत्साहातला कार्यक्रम हा शेवटचा होणार काय याची चर्चा शिक्षक वर्गही करु लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seeing the waiting, the night passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.