बियाण्यांची टंचाई भेडसावणार !
By Admin | Updated: June 11, 2017 00:14 IST2017-06-11T00:14:08+5:302017-06-11T00:14:08+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.

बियाण्यांची टंचाई भेडसावणार !
खरीप हंगाम तोंडावर : केवळ १७,५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध
देवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्क
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. दि.३१ मे अखेर केवळ १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मागणीपेक्षा बियाणांचा पुरवठा कमी झाला असल्याने जिल्ह्यात बियाण्यांची तीव्र टंचाई भेडसावण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०१७-१८ करीता भातासाठी ३८ हजार ८७० क्विंटल, सोयाबीनसाठी ५६५ क्विंटल आणि तुरसाठी ७०० क्विंटल असे एकूण ४० हजार १३५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी महाबिजमार्फत भाताचे १४ हजार ७० क्विंटल, सोयाबिनचे १८५ क्विंटल व तुरीचे ३०० क्विंटल असे एकूण १४ हजार ५५५ क्विंटल बियाणांची मागणी तर, खासगीमार्फत भाताचे २४ हजार ८०० क्विंटल, सोयाबिनचे ३८० क्विंटल व तुरीचे ४०० क्विंटल, असे एकूण २५ हजार ५८० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली. आयुक्तालयाकडून भाताकरीता १७ हजार ३५४ क्विंटल, सोयाबिनसाठी ३५ क्विंटल व तुरीकरीता १३९.३ क्विंटल असे एकूण १७ हजार ५२९ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
मागिलवर्षी सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात भाताखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७६ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात १ लाख ७३ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने खरीप हंगामासाठी भाताकरीता ३३ हजार २०० क्विंटल, सोयाबिनकरीता ३ हजार ८०० व तुरीकरीता ६५० क्विंटल, असे एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली होती. त्यापैकी भाताचे ३० हजार ५३१ क्विंटल, सोयाबिनचे ३२१ व तुरीचे १६० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप पिकाच्या नियोजनामध्ये जिल्ह्यात भात, सोयाबिन व तूर हे तीन प्रमुख पिके आहेत. भात पिकाचे क्षेत्रात तीन हेक्टरने वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. यावर्षी प्रशासनाने भातपिकासाठी ३८ हजार ८७० क्विंटल बियाणांची मागणी केली असली तरी कृषी आयुक्तालयाकडून ३१ मे अखेर १७ हजार ३५४ क्विंटल भात बियाणांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा २२बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल, असे जिल्हा परीषद कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
बळीराजा बियाण्यांच्या जुळवाजुळवीत व्यस्त
शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही "रिस्क" न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही.