पोलीस ठाणे, वीज कंपनी कार्यालयाला ठोकले सील
By Admin | Updated: March 21, 2017 00:27 IST2017-03-21T00:27:14+5:302017-03-21T00:27:14+5:30
नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कराची थकित रकमेची वसुलीकरीता सुरू असलेली धडक मोहीमेचा फटका आज शहरातील शासकीय कार्यालयांना बसला.

पोलीस ठाणे, वीज कंपनी कार्यालयाला ठोकले सील
पवनी : नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कराची थकित रकमेची वसुलीकरीता सुरू असलेली धडक मोहीमेचा फटका आज शहरातील शासकीय कार्यालयांना बसला. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी न.प. कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनेक शासकीय कार्यालयांना सिल लावले असून यात प्रामुख्याने पोलीस ठाणे, विज वितरण कंपनीचे कार्यालय आणि शाखा अभियंता पाटबंधारे व्यस्थापन शाखा पवनीचे कार्यालयाला सिल ठोकण्यात आले.
थकीत असलेल्या मालमत्ता करांचा भरणा करण्यासंबंधाने क्षेत्रातील जनतेला तसेच शासकीय कार्यालयांना नोटीस देण्यात आली आहे. या दरम्यान शहरातील अनेक मालमत्ता व व्यापारी गाळ्यांना सिल करीत नगर परिषदेचे इरादे बुलंद असल्याचे दाखवून दिले. परंतू शासकीय कार्यालयातील प्रमुखांनी याबाबीकडे डोळेझाक केल्यामुळे सोमवारी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगर परीषदेच्या कर्मचाऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट देवून कर भरण्याविषयीची संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. भंडारा कार्यालयाकडून धनादेश मिळताच मालमत्ता कराचा भरणा करणार असल्याचे सांगितले. परंतू मुख्याधिकारी यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी कमाचाऱ्यांना आदेश देत विज वितरण कंपनीचे कार्यालयाला सिल लावण्याची कारवाई केली.
विज वितरण कंपनीकडे रू. ३०२००/- पोलीस ठाणे पवनीकडे १,१९,०४७/- आणि शाखा अभियंता पाटबंधारे व्यस्थापन शाखा पवनीकडे ७४३२/- एवढी रक्कम थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कार्यवाही संबंधाने पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचेशी चर्चा केली असता नगर परिषदेच्या मालमत्ता कराविषयाची मागणी शासनाकडे केली आहे. मागणी रक्कम मिळताच तात्काळ नगरपरिषदेत भरणा केला जाईल असे सांगुन पोलीस निरीक्षक, सहा पो. निरीक्षक व पोलीस उपनिररक्षक यांचे कार्यालयाला न.प.ने कार्यवाही करीत सिल लावल्या संबंधाने वरीष्ठांकडे कळविले असल्याचे सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)