शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर
By Admin | Updated: February 24, 2017 00:28 IST2017-02-24T00:28:55+5:302017-02-24T00:28:55+5:30
येथील गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर केल्याची तक्रार

शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर
जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार : पालांदूर येथील गोविंद विद्यालयातील प्रकार
पालांदूर : येथील गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना पालांदूर येथील डॉ. दिलीप फरांडे यांनी केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत पालांदूर गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरीता शालेय पोषण आहाराची व्यवस्था शासकीय निधीतून केली आहे. मात्र शासनाच्या मुख्य हेतूला बाजूला ठेवत या निधीची अफरातफर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अरविंद रामटेके यांनी कुणालाही विश्वासात न घेता केल्याचा आरोप डॉ. दिलीप फरांडे यांनी केला आहे. विद्यालयाच्या नावावर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पालांदूर चौ. खाते क्रमांक ३०३/४७४ मधून २० जानेवारीला मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खाते क्रमांक ३०२/८६०५ त्याच बँकेच्या शाखा लाखनी येथे १७ हजार एनएफईटी द्वारे वळते केले. करिता सखोल चौकशी करून पोषण आहाराच्या रकमेची अफरातफर वैयक्तीक लाभाकरीता केली असल्याने कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे. (वार्ताहर)
पालांदूर शाखेला रोखची अडचण असल्याने लाखनी शाखेला रक्कम वळती केली. त्या रक्कमेतून शाळेकरीताच बायोमेट्रिक मशिन खरेदी केली असून ती रक्कम मी १६ फेब्रुवारीलाच खात्यात जमासुद्धा केली आहे. यात रकमेची अफरातफरचा मुद्या येतच नाही. नाहक मला बदनाम करण्याचा षडयंत्र विेरोधक रचित आहेत.
-प्राचार्य अरविंद रामटेके, गोविंद विद्यालय पालांदूर