शालेय पोषण आहाराचे धान्य वाहनासह पकडले
By Admin | Updated: August 5, 2014 23:20 IST2014-08-05T23:20:39+5:302014-08-05T23:20:39+5:30
मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत होते. ही बाब लक्षात येताच शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य

शालेय पोषण आहाराचे धान्य वाहनासह पकडले
भंडारा : मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत होते. ही बाब लक्षात येताच शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य साठ्यासह गाडी पकडली. यामुळे शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील मानेगाव येथील चैतन्य शिक्षण संस्थेच्या वतीने चैतन्य विद्यालय चालविल्या जाते. या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मध्यांन्ह भोजण योजनेच्या अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा होतो. विद्यार्थ्यांचे जीवनमान व त्यांची शरीरीक वाढ योग्य व्हावी या दृष्टीने राज्य शासन शालेय पोषण आहार योजना राबवित आहे. यावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात येतो. सदर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आलेले शालेय भोजन योजनेचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याची माहिती शाळेच्या शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती.
यानुसार त्यांनी मागील काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. सोमवारला श्रावण सोमवार असल्याने दुपारच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर शालेय पोषण आहाराचे धान्य एमएच-४०/वाय-८२६१ या बोलोरो गाडीत भरीत असल्याची माहिती पालक शिक्षक संघाचे किशोर हरडे व माजी सरपंच नत्थू बांते यांना मिळाली. यावरून त्यांनी गाडीचा पाठलाग केला. धान्यसाठा भरून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या सदर वाहनाला सिल्ली येथे थांबवून गाडीचालक मंगेश कांबळे याची विचारणा केली व गाडीची तपासणी केली असता त्यात १२ पोते तांदूळ, तेलाचे पिंप, अर्धा पोते जिरा, तुवर दाळ १० बॅग, अर्धा बॅग मिठ, हळद, मिरची पावडर, दोन बॅग चनादाळ हे धान्य साठा आढळून आला.
विद्यार्थ्यांचे शालेय पोषणाचे साहित्य परस्पर विक्रीस जात असल्याची बाब लक्षात आल्याने ती जप्त करून गाडीसह ते ग्रामपंचायत येथे आले. यानंतर सदर घटनेची माहिती शालेय पोषण आहाराच्या अधिकारी मंजुषा गजभिये, कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे, केंद्रप्रमुख डुंभरे, तलाठी भेंडारकर, बीट जमादार बहादुरे आदींना देण्यात आली. सदर माल जप्त करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणाची विक्री करू पाहणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक व यात सहभागी असणाऱ्या अन्य लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किशोर हरडे, नत्थू बांते, कैलास कोटांगले, कुलदीप सुखदेवे, रणविर डोरले, दिवाकर मने, विलास सुर्यवंशी, श्रीकांत गभणे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)