मुलाच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापन जबाबदार
By Admin | Updated: August 3, 2015 00:29 IST2015-08-03T00:29:43+5:302015-08-03T00:29:43+5:30
तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा...

मुलाच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापन जबाबदार
वडिलांचा आरोप : न्याय देण्याची मागणी
तुमसर : तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा प्रफुल गळीराम वरकडे याच्या मृत्यूस शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप मृतकाचे वडील गळीराम वरकडे यांनी केला आहे.
गोबरवाही जवळील पवनारखारी येथे खासगी अनुदानित इंदिराबाई मरसकोल्हे आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेत संचालकाचा वाद फोफावला असल्यानेच तेथील कर्मचाऱ्यात शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविले जात नाही. १५ दिवसापूर्वी गळीराम वरकडे रा.राजापूर यांचा मुलगा प्रफुल वरकडे (१२) हा आश्रमशाळेत गेला. त्यावेळी तो सुदृढ होता. त्याला कसलीही जखम किंवा आजार नसतानाही त्याची प्रकृती अचानक बिघडली असल्याचे सांगल्या जात असून त्याच्या मानेवर सूज आल्याचे सांगण्यात येत आहे. ती सूज कशी आली? त्याला कोणी मारले असावे? की तो खाली पडून त्याला जखम झाली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून जर त्याच्या मानेवर सूज दिसत होती तर शाळा व्यवस्थापनाने याची माहिती पालकांना देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. इतकेच काय तर जेव्हा प्रफुल्लला दि. २९ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दाखल केल्यानंतर देखील त्याच दिवशी पालकांना महिती न देता दुसऱ्या दिवशी दि. ३० जुलैला सांगण्यात आले. त्यावेळी प्रथम तुमसर व नंतर भंडारा येथे रेफर केल्या गेले व नंतर नागपूर येथे रेफर करीत असतानाच वाटेतच त्याचे निधन झाले असून शाळा प्रशासन डोळ्यात सूज आल्याचे सांगते तर ती सूज आली कशी हे अजूनपर्यंत अनुत्तरीय असून माझ्या मुलावर जर वेळीच उपचार केला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता. मात्र असे काहीच करण्यात न आल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे गळीराम वरकडे यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)