शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 9, 2015 00:50 IST2015-08-09T00:50:29+5:302015-08-09T00:50:29+5:30
तुमसर तालुक्यातील येरली येथे एका शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न शाळकरी मुलांच्या ओरडण्यामुळे फसला.

शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
येरली येथील घटना : मुलांनीच आरडाओरड केल्याने अनर्थ टळला
तुमसर : तुमसर तालुक्यातील येरली येथे एका शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न शाळकरी मुलांच्या ओरडण्यामुळे फसला. मागील १२ दिवसापासून तुमसर शहर व तालुक्यात टोळी सक्रीय असल्याची चर्चा आहे. येरली येथे ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
येरली येथील देवेश पटले यांचा १० वर्षीय यश हा मुलगा ममता प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वीत शिकतो. शुक्रवारी तो मित्रांसोबत शाळेत गेला. शाळेबाहेर दोन महिला व दोन अनोळखी पुरूष उभे होते. त्यांनी यश याचा हात पकडला. अनोळखी इसमाने हात पकडल्याने यश भेदारला. यशच्या वर्गमित्रांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे संबंधित पुरूष व महिला पळून गेले. या घटनेची चर्चा येरलीत पसरली. या प्रकरणाची मात्र तुमसर पोलीसात तक्रार करण्यात आली नाही. यशचे कुटुंब कामानिमित्त शेतावर गेले होते. नित्यनियमाने यश शाळेत गेला. ग्रामीण परिसरात अशी टोळी सक्रीय असल्याची चर्चा मात्र सुरू आहे. शुक्रवारी तुमसर पोलिसांच्या फिरत्या पथकाने चार महिलांना चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. चौकशी करून त्यांना नंतर सोडून देण्यात आले. १२ दिवसापूर्वी तुमसर शहरात दोन शाळकरी मुलींचा अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. या घटनेमुळे विद्यार्थी तथा पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)