शालेय विद्यार्थी बनले ‘आरोग्य रक्षक’

By Admin | Updated: August 9, 2015 00:48 IST2015-08-09T00:48:24+5:302015-08-09T00:48:24+5:30

डेंग्यू या विषाणुजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला तर मागीलवर्षी सहा जणांचा मृत्यू झाला.

'School of Health' becomes a schoolchildren | शालेय विद्यार्थी बनले ‘आरोग्य रक्षक’

शालेय विद्यार्थी बनले ‘आरोग्य रक्षक’

प्रशांत देसाई ल्ल भंडारा
डेंग्यू या विषाणुजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला तर मागीलवर्षी सहा जणांचा मृत्यू झाला. यावर्षी आरोग्य विभागाने डेंग्यूशी लढण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. डेंग्यू डास अळी शोधून त्यांचा नायनाट करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. जिल्ह्यातील २२९ शाळांमधील सुमारे ४५ हजार ४४४ विद्यार्थी डेंग्यू डास अळी शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थीच आता ‘आरोग्य रक्षका’ची भूमिका बजावणार आहेत.
मागील वर्षी जिल्ह्यातील १३२ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षण दिसून आले होते. त्यांचे रक्त नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात ६२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. यात माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या मोहिमेत शाळांच्या संख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शालेय आरोग्य शिक्षण मोहिमेसाठी प्रत्येक शाळेसाठी आरोग्य कर्मचारी संवादकाची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील २२९ माध्यमिक शाळांमधील ४५ हजार ४४४ विद्यार्थ्यांसह १ हजार ४४३ शिक्षकांचा या मोहिमेत सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे गट स्थापन करून त्यांना गावातील घरे वाटप करण्यात येतील. गावात जनजागृती होण्याच्या दृष्टिने शालेय विद्यार्थ्यांमार्फत दिंडी, किर्तनातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जुलै हा महिना डेंग्यू प्रतिरोध महिना राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना डेंग्यू डास अळी शोध मोहिम राबविण्यासाठी शनिवार हा आठवड्यातील एक दिवस ठरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी शोधलेली डास अळीस्थाने शिक्षकांना दाखविल्यानंतर ती नष्ट करण्यात येणार आहे. ज्या घरी पाण्याची साठवणूक किंवा परिसरात डबके साचून राहते, अशा घरातील व्यक्तींना डेंग्यू व अन्य आजाराची माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. ही मोहिम जुलै ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत राबविली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने काळजी घेत, डेंग्यू डास अळी शोध मोहिम राबवून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिने डेंग्यू डास अळी शोध मोहिम राबविली आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना साथ रोग मुक्त अभियानाचे महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून ‘हात धुवा’चे प्रात्यक्षिक करून घेतले. डेंग्यू डास शोध मोहिम व साथ रोग मुक्त अभियानाची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. जनजागृतीसाठी आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्याने त्यांना आरोग्य दूताची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
डेंग्यू आजारामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, यासाठी यावर्षी आरोग्य विभागाने जनजागृतीवर भर दिला आहे. आरोग्य विभाग सज्ज आहेत. प्रत्येक गावात जनजागृती व डेंग्यू अळी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह सरपंच, ग्रामसेवक, अशावर्कर, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आरोग्य कर्मचारी व अन्य विभागाचे कर्मचारी यांचा यात सहभाग राहणार आहे. शंभरातील केवळ तीन किंवा त्यापेक्षा कमी घरात डास अळ्या मिळाव्या असा प्रयोग सुरू आहे.
- डॉ. विजय डोईफोडे
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, भंडारा.
विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस
डेंग्यू अळ्यांचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट पाडण्यात येईल. जो गट सर्वाधिक डेंग्यू अळी शोधून त्याना नष्ट करेल अशा गटाला बक्षीस देण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यातील १० हजार रूपयांमधून बक्षीसांसाठी काही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.यामुळे डेंग्यू डास अळी शोधण्यात विद्यार्थ्यांचे गट सक्रीय सहभाग घेऊन डास शोध मोहिम राबविणार आहेत.
स्थानिक प्रशासनावर जबाबदारी
आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात डेंग्यू शोध मोहिम व जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाने सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कोणत्याही गावात आरोग्य सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होणार आहे.
डेंग्यूची उत्पत्ती एडिस डासापासून
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. डेंग्यूचा विषाणू एडिस डासाच्या मादीमुळे पसरते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी टाकतो. डेंग्यूवर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे डासोत्पत्ती प्रतिबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा नियंत्रणात्मक उपाय आहे. एडिस डासाची उत्पत्ती थांबविण्याकरिता लोकसहभागाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.

Web Title: 'School of Health' becomes a schoolchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.