वांगी येथे शाळा बंद आंदोलन
By Admin | Updated: December 9, 2014 22:46 IST2014-12-09T22:46:06+5:302014-12-09T22:46:06+5:30
पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षण विभागाने आश्वासन न पाळल्याने आज पुन्हा शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी व पालकांनी शाळा बंद

वांगी येथे शाळा बंद आंदोलन
साकोली : पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षण विभागाने आश्वासन न पाळल्याने आज पुन्हा शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी व पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. यापूर्वीसुध्दा दि. १३ नोव्हेंबर रोजी अशाच प्रकारचे शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते. हे येथे विशेष उल्लेखनीय. तरीही शिक्षण विभाग गाढ झोपेत कसा, असा प्रश्न परिसरातील जनतेला पडलेला आहे.
माहितीनुसार, साकोलीपासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेत वरिष्ठ प्राथमिक शाळा वांगी येथे आहे. या शाळेत वर्ग १ ते ८ असुन या शाळेत एकूण १५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेसाठी शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे ८ पदे मंजुर आहेत. मात्र या वर्षीच्या सत्राच्या सुरुवातीपासुन या शाळेत ४ शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी व पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन देऊन वारंवार शिक्षक देण्याची विनंती केली. मात्र या विनंतीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली.
दि. १३ नोव्हेंंबर रोजी शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण विभागातर्फे विस्तार अधिकारी पडोळे हे वांगी येथील शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांनी चार शिक्षकापैकी एका शिक्षकाची व्यवस्था केली होती व उर्वरित शिक्षकांची व्यवस्था गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करुन करु, असे आश्वासन दिले. याला एक महिन्याचा कालावधी लोटला तरी तीन पदवीधर शिक्षक या शाळेत आलेच नाही. नविन सत्रापासून वर्ग ६ ते ८ या वर्गाला शिकविण्यासाठी एकही पदविधर शिक्षक या शाळेत नाही. त्यामुळे गावकरी चिडले व त्यांनी आपल्या मुलांना शाळैतच पाठविले नाही व जोपर्यंत तीन पदवीधर शिक्षक स्थायी मिळणार नाही तोपर्यंत हे शाळा बंद आंदोलन सुरुच राहील असा पवित्रा आता घेण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)