देवेंद्रच्या परिश्रमापुढे नमली ‘सरस्वती’

By Admin | Updated: October 25, 2014 22:34 IST2014-10-25T22:34:58+5:302014-10-25T22:34:58+5:30

कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हवी असते मनात जिद्द. मनुष्याने मनात जिद्द बाळगल्यास आयुष्यात येणाऱ्या संकटांवर लिलया मात करता येते. परिस्थिती बेताची असताना कठिण

'Saraswati' has been given to Goddess Dharma | देवेंद्रच्या परिश्रमापुढे नमली ‘सरस्वती’

देवेंद्रच्या परिश्रमापुढे नमली ‘सरस्वती’

परिस्थितीवर केली मात : मिळेल ते काम करून शिक्षण केले पूर्ण
प्रशांत देसाई - भंडारा
कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हवी असते मनात जिद्द. मनुष्याने मनात जिद्द बाळगल्यास आयुष्यात येणाऱ्या संकटांवर लिलया मात करता येते. परिस्थिती बेताची असताना कठिण परिश्रमातुन शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे विद्येची देवता सरस्वतीही त्याच्यापुढे नमली, हलाखीची परिस्थिती व मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच देवेंद्रने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला आहे.
भंडारा शहरातील लाला लजपतराय वॉर्डातील विश्वनाथ व सुशिला भुरे या दाम्पत्यांचा मुलगा देवेंद्रने परिश्रमातुन शिक्षण पूर्ण करण्याचा मानस ठेवल्याने त्याला सरस्वतीनेही बळ दिले. वडील विश्वनाथ हे मजुरी करून कुटूंबाचा गाडा चालवितात तर आई गृहिणी आहे. भुरे दाम्पत्याला तीन अपत्य असून देवेंद्र हा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. घरची परिस्थिती बेताची असल्याने देवेंद्रने लहानपणापासूनच स्वकमाईनेच शिक्षण पूर्ण करण्याची खुणगाठ मनाशी बांधली होती. घरात देवेंद्रला शिक्षणासाठी आर्थिक चणचण जाणवत होती. मात्र देवेंद्रला शिकुन मोठे व्हायचे होते. शिक्षणात खंड न पडू देता त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी त्याने केली होती. प्रत्येकच आई-वडील पाल्यांना शिक्षणाच्यासुविधा देताना त्यांना अत्याधुनिक सोयी पुरवितात. अभ्यासासाठी त्यांना स्वतंत्र खोली व घरात पोषक वातावरण निर्माण करतात. मात्र देवेंद्रच्या बाबतीत हे केवळ दिवास्वप्न होते. परिस्थितीवर कोणत्याही परिस्थितीत मात करण्याचे त्याने ठरविले होते.
देवेंद्रची मेहनत करण्याची वृत्ती व त्याचा स्वभाव यामुळे त्याला मदत करणाऱ्यांनीही सढळ हाताने मदत केली. देवेंद्रला खात रोडवरील नेताई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाच्यावेळी आर्थिक चणचण निर्माण झाली, त्यासाठी त्याला कंकर अटराये, सुजाता गौरी यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या मदतीतुन प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. विजतंत्री शाखेसाठी त्याचा प्रवेश झाला. यानंतर सुरू झाला देवेंद्रच्या खऱ्या परिक्षेचा काळ.
परिश्रम करूनच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द असल्याने देवेंद्रने पहाटे उठून पेपर वाटण्याचे काम हाती धरले. यासाठी तो पहाटे घरून निघताना आयटीआयचे दफ्तर पाठीवर घेऊनच सायकलने शहरातील पेपर वाटप करायचा. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूुचा सामना करीत त्याने न डगमगता पेपर वाटप करून नित्याने सकाळी ७ वाजताची बस पकडून आयटीआयमध्ये जात असे. छोटे घर असल्याने त्याला अभ्यास करताना अडचणी निर्माण होत होत्या, ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्राची आई नंदा घरडे यांनी स्वत:च्या घरची एक खोली अभ्यासासाठी देवेंद्रला दिली. वर्षभरानंतर त्याने आयटीआयची परिक्षा दिली. यात तो चांगल्या गुणांनी नव्हे तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण झाला. शिक्षकाने त्याला जिल्ह्यात पहिला आल्याचे सांगताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. निकाल ऐकताच त्याने आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. निकालानंतर त्याची स्किल स्पर्धेसाठी निवड झाली, हे विशेष.
उच्च शिक्षित आई-वडील पाल्यांसाठी खर्च करतात. मात्र त्यांना अपेक्षित निकाल मुलांकडून क्वचितच मिळतो. परिस्थिती नसतानाही देवेंद्रने त्यावर मात केली. सध्या दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सुट्ट्यामुळे तरूण आतषबाजीत मशगुल आहेत. मात्र परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास होऊनही देवेेंद्रला परिस्थितीमुळे आनंदावर विरजण घालुन शहरातील मुख्य चौकातील एक पेट्रोल पंपवरील हवा केंद्रावर हवा भरण्याचे काम करावे लागत आहे. शिक्षणाची महत्वाकांक्षा बाळगलेल्या देवेंद्रच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी खरोखरच मदतीची गरज आहे.

Web Title: 'Saraswati' has been given to Goddess Dharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.