महिला सरपंच-सदस्यांमध्ये ‘फ्रीस्टाईल’
By Admin | Updated: May 7, 2015 00:25 IST2015-05-07T00:25:56+5:302015-05-07T00:25:56+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या मासिक सभेत हिसोब मागितल्याच्या

महिला सरपंच-सदस्यांमध्ये ‘फ्रीस्टाईल’
गोंदेखारी येथील प्रकार : प्रकरण तंमुसच्या हिशोबाचे
चुल्हाड (सिहोरा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या मासिक सभेत हिसोब मागितल्याच्या कारणावरुन महिला सरपंचाने विरोधी गटातील महिला सदस्याला मारहाण केली. ही घटना गोंदेखारी येथील ग्राम पंचायतीमध्ये घडली. यामुळे गावात वातावरण चांगलेच तापले आहे.
सात सदस्यीय गोंदेखारी ग्राम पंचायतमध्ये सत्ताधारी गटाचे पाच तर विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत. अल्का शेंडे या सरपंच पदी विराजमान आहेत. दरम्यान गावाला तंमुस आणि निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल ला घेण्यात आले. या पुरस्काराचे नियम धाब्यावर बसवून मर्जीतील लोकांना बक्षीसाची राशी वाटप करण्यात आली. यामुळे मर्जीतील लोकांना राशीचे वाटप झाले असल्याचे आरोप विरोधी गटाचे सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, मासिक सभा २८ एप्रिल ला आयोजित करण्यात आली. सभा सुरु असतांना राधा बनकर यांनी तंमुसच्या बक्षीस वितरण सोहळयात झालेल्या खर्चाची विचारणा केली. हिशोब मागितला असतांना सरपंच अल्का शेंडे यांनी हिशोब देण्यास नकार दिला. दोन तास शाब्दीक चकमक सुरु होती.
यामुळे मासिक सभेत गोंधळ उडाला. सरपंच अल्का शेंडे यांनी बनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बनकर यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले.
सदस्यांना मासिक सभेत हिशोब मागण्याचा अधिकार आहे.परंतु सत्ताधारी यात आलबेल करीत असल्याने विरोधी गटातील सदस्यांना हिशोब देण्यास नकार देत आहेत. असा आरोप विरोधी गटातील सदस्य करित आहेत. तर सरपंच पदाची गरिमा असतांना वारंवार सभेत उर्मट शब्दात महिला सरपंचाला विचारणा करण्यात येत आहे.
विरोधी गटाचे सदस्य वाद उकरुन काढत आहेत. असा आरोप सत्ताधारी गटाचे पदाधिकारी करीत आहे. भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गोवध्रन शेंडे यांच्या सरपंच अल्का शेंडे ह्या पत्नी आहेत. तर विरोधी बाकावर असणाऱ्या राधा बनकर या राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते रामकृष्ण बनकर यांच्या पत्नी आहेत. या वादाने दोन महिला पदाधिकाऱ्यांची होणारी जुगलबंदी गावकरी अनुभवत आहेत. (वार्ताहर)
विरोधी गटाचे महिला सदस्य तंमुसचा हिशोब अर्वाच्य भाषेत मागत होते. सरपंच पदाची गरिमा ठेवली नाही. यामुळे शाब्दिक चकमक झाली. त्यांना मारहाण केली नाही.
-अल्का शेंडे
सरपंच, गोंदेखारी
तंमुसच्या मासिक सभेत हिशोब मागितला असता सरपंच धावून आल्या. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे प्रत्युत्तर दिले. सरपंच विरोधात तक्रार देणार आहे.
-राधा बनकर
सदस्य, गोंदेखारी