मुलींच्या आरोग्यासाठी सरसावली ग्रामपंचायत
By Admin | Updated: January 26, 2016 00:28 IST2016-01-26T00:28:26+5:302016-01-26T00:28:26+5:30
मुली वयात आल्या की, त्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात हिमोग्लोबीन ही मुख्य समस्या सध्या आढळून येत आहे.

मुलींच्या आरोग्यासाठी सरसावली ग्रामपंचायत
२० मुलींच्या आहारावर केला खर्च
प्रशांत देसाई भंडारा
मुली वयात आल्या की, त्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात हिमोग्लोबीन ही मुख्य समस्या सध्या आढळून येत आहे. या समस्येवर आरोग्य विभाग कार्यरत असला तरी, ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला आहे. लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने मुलींच्या हिमोग्लोबीन वाढीसाठी शिबीर राबविले आहे. असा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
गावात शासकीय योजना राबवून शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने गावाचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहचविले आहे. अशा गावातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. विवाहपूर्व व विवाहानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर ग्रामपंचायत कमिटीने सभेत चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरवून तसा प्रत्यक्षात पुढाकार घेतला.
यात गावातील १३ ते २५ या वयोगटातील ७० किशोरवयीन मुलींची आंग्ल दाखाखाना व पिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहयोगातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यात २० मुलींचे हिमोग्लोबीन १० मिलीग्रॅमपेक्षा कमी आढळून आले. हिमोग्लोबीनसोबतच मुलींची सिकलसेल, रक्तगट तपासणी करण्यात आली.
हिमोग्लोबीन कमी आढळून आल्याने ग्रामपंचायतीने अंगणवाडी केंद्रात त्यांच्या आरोग्यासाठी सकस आहाराचे शिबीर लावले. यात त्यांना आयर्नयुक्त मुंगाचे उसळ, गाजर, बीट, पराठे, पालक, मेथी पराठे, राजमा उसळ, चना उसळ व शेंगदाण्याची चटणी नियमित आहारात देण्यात आले. हे शिबीर अठरा दिवस राबविण्यात आले. यावर ग्रामपंचायतीने स्व:निधीतून सुमारे १५ हजार रूपये खर्च केले.
शिबीरानंतर मुलींच्या हिमोग्लोबीनची पुन्हा तपासणी करण्यात आली. यात वाढ झाल्याचे प्रमाण आढळून आले. आयर्नयुक्त सकस आहाराने मुलींच्या हिमोग्लोबीनमध्ये ११ ते १४ मिलीग्रॅमपर्यंत वाढ झाली. यावेळी त्यांना वैद्यकीय अधिकारी सायली डहारे यांनी त्यांच्या शंकांचे निरसण केले. आरोग्य विभागाने राबवायची जबाबदारी शिवणी ग्रामपंचायतीने राबविली. गावातील मुलींच्या आरोग्यासाठी धडपड करणारी शिवणी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविल्यास किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबीनच्या समस्या मार्गी लागू शकेल असा हा आदर्श उपक्रम ठरणारा आहे.
ग्रामपंचायतीचा पुढाकार
विवाहानंतर नविन आयुष्याची सुरूवात करणाऱ्या मुलींच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले राहिल्यास त्यांना प्रसुतीनंतर सुदृढ बाळ जन्मास येईल. हा महत्वाचा मुद्दा समोर ठेवून ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या सहकार्यातून सकस आहार शिबीर राबविले. यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
लाजणे ही समस्या कारणीभूत
किशोरवयीन मुलींच्या शरीराच्या वाढीसोबतच त्यांच्या आहाराचे प्रमाणही वाढते. मात्र, अनेकदा मुली या वयात खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सुदरतेकडे लक्ष देतात. यामुळे आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने शरीरात आयर्नचे प्रमाण कमी होतात. त्यासोबतच मासीक पाळीचे दिवस असल्याने त्याचे अनेक विकारही ज्यात अतिरक्तस्त्राव होतो. मात्र, या वयात त्यांचे लाजण्याचे प्रमाणही अधिक असल्याने समस्या सांगण्यासाठी लाजतात. यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करण्यास अडचण निर्माण होते.
गावातील महिला व मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी राहणार नाही. व गावची मुलगी विवाहानंतर बाहेरगावी गेल्यानंतर तिला कुणी हिनवणार नाही. याची काळजी तसेच गावात विवाह होवून येणारी सुन हिचेसुध्दा हिमोग्लोबीन प्रमाण तपासणी करण्यात येणार आहे.
-जयंत गडपायले
ग्रामविकास अधिकारी,
ग्रामपंचायत शिवणी