डोंगरगाव तलावातून मुरूमाचे सर्रास खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:36 IST2018-03-30T22:36:28+5:302018-03-30T22:36:28+5:30
बावनथडी प्रकल्पाच्या डोंगरगांव जवळील नहराच्या पाळीवर घालण्यासाठी डोंगरगाव येथील मालगुजारी तलावातून मुरूमाचे अवैधरित्या खनन करण्यात येत आहे.

डोंगरगाव तलावातून मुरूमाचे सर्रास खनन
आॅनलाईन लोकमत
करडी/पालोरा : बावनथडी प्रकल्पाच्या डोंगरगांव जवळील नहराच्या पाळीवर घालण्यासाठी डोंगरगाव येथील मालगुजारी तलावातून मुरूमाचे अवैधरित्या खनन करण्यात येत आहे. यामुळे या तलावात सहा फूट खोल खड्डे निर्माण झाल्याने पावसाळ्यात जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तलावातून तीन फुटाखाली खोदकाम करता येत नाही. तसेच खोदकाम एकसारखे करणेहीे उचित असते. परंतू डोंगरगांव येथील मुख्य रस्त्याजवळील मालगुजारी तलावात मनमानीपणे व नियमाला डावलून सहा सात फुटापर्यंत खड्डे करून मुरूम काढण्यात येत आहे. एवढेच नाही तर एकदम तलावाच्या पाळीपासून ते मोहाडी जवळील रस्त्यापर्यंतच्या तीन ते चार कि़मी. नहराच्या पाळीवर हा मुरूम घालण्यात येत आहे.
हा नहर बावनथडी प्रकल्प कार्यालय अंतर्गत असून या कार्यालयातर्फे तहसिल कार्यालयात मुरूम खननासाठी रॉयल्टी सुद्धा भरण्यात आली आहे. मुरूम उत्खननाचे काम एका ठेकेदाराकडून केल्या जात आहे.
मुरूम उत्खनन करताना संपूर्ण तलावातील मुरूम तिन फुट खोदकाम करून एकसमान खोदकाम करण्यात आले असते तर तलाव खोलीकरणाचे काम सुद्धा झाले असते. तलावात पाणी सुद्धा साठून राहू शकले असते. मात्र तसे न करता ठिकठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मुरूम आहे त्याच ठिकाणी सहा फुटापर्यंत खोल खड्डे खोदण्यात आले आहे. मात्र यामुळे तलावात पाणी साठवल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज न आल्यास मनुष्यासह जनावरांनाही धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
खड्डे बुझविण्यात येण्याची शक्यता
सहा फूट खोल खड्ड्याबाबत खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या व्यवस्थापकाला विचारले असता, हे खड्डे तीन फुटांपर्यंत बुजविण्यात येणार आहेत. मात्र यामुळे कच्ची माती असल्याने तिथे दलदल निर्माण होवून तो पुन्हा घातक ठरणार आहे. जनावरे पाण्यात गेली तर या दलदलमध्ये फुसून जनावरांना पाण्याबाहेर निघने अशक्य होईल. तलावाच्या याच ठिकाणावर डोंगरगाव येथील काही महिला कपडे धुण्यासाठी सुद्धा येतात हे विशेष. या बाबीकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मोहाडीच्या तहसिलदारांनी याची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.
बावनथडी प्रकल्प कार्यालयाकडून रॉयल्टीची रक्कम भरण्यात आली आहे. अंदाजपत्रकानुसार किती मिटर खोल खोदकाम करायचे आहे, हे तपासून पाहण्याचे तसेच काम नियमानुसार आहे किंवा नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
- सूर्यकांत पाटील, तहसीलदार मोहाडी.
डोंगरगाव तलावात खोल खड्डा तयार करण्यात आला असून तो धोकादायक आहे. काही मुले पोहण्यासाठी सुद्धा जातात. उंच भागातून एक समान मुरूम काढले असते तर तलावाचे खोलीकरण आले असते. पावसाळ्यानंतर जिवितहानी होण्याची शक्यता आहे.
- राजेश गभने, सामाजिक कार्यकर्ता, डोंगरगाव