जलयुक्त शिवार अभियान गावासाठी संजीवनी
By Admin | Updated: May 4, 2015 00:41 IST2015-05-04T00:41:37+5:302015-05-04T00:41:37+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल.

जलयुक्त शिवार अभियान गावासाठी संजीवनी
सिरसी येथे उद्घाटन सोहळा : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन
वरठी : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल. यामुळे तलावात पाणी साठवून राहील. गाळ उपसादरम्यान निघणारी माती रस्ते व शेतात उपयोगी येईल. गावाची पाण्याची पातळी वाढेल. शेतीकरिता पाणी उपलब्ध होईल. गावातील मजुरांना काम मिळेल. तलावात मासे उत्पादन केल्यास ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल. गुराढोरांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी टंचाई भासणार नाही. जलयुक्त शिवार अभियान हे गावासाठी संजीवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केले.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सभापती अरविंद भालाधरे, सरपंच संजय वासनिक, उपसरपंच रविंद्र वंजारी, सदस्य सुमित्रा सोनटक्के, तारा वाघमारे, दुगा मदनकर उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासनाचे उद्देश व धोरण समजावून सांगितले. यावेळी असर फाउंडेशन विक्रम फडके, वैभव कोलते यांच्या चमूने जनजागरण पथनाट्य सादर केले. संचालन संतोष कारोमोरे, प्रस्ताविक संजय वासनिक व आभार ग्रामसेवक धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमात शाखा अभियंता एकापुरे, बोरकर, शोभा बारई, कुंडलीक मदनकर, लिला मदनकर, हलमारे, मस्के व उषा वाघमारे उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणी हे निसर्गाचे अमुल्य देणं आहे. पण निसर्गाचा हा अमुल्य ठेवा मानवी प्रवृत्तीमुळे कमी होत आहे. जमिनीच्या पोटातून उपसा होणारे पाणी जमिनीत जीरत नाही. असेच सुरु राहिले तर एक दिवस सभोवताल पाण्यासाठी घरांघरात, गावांगावात युद्ध होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु करण्यासह पाण्याचा दुरुपयोग करू नका.
अॅड.रामचंद्र अवसरे
आमदार, भंडारा विधानसभा क्षेत्र