जेसीबीने होतोय रेतीचा उपसा
By Admin | Updated: April 20, 2016 00:58 IST2016-04-20T00:58:00+5:302016-04-20T00:58:00+5:30
पवनी तालुक्यातील मांगली (चौ.) नदीपात्रातून परवानगी नसतानाही खुलेआम जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे.

जेसीबीने होतोय रेतीचा उपसा
मांगली येथील प्रकार : शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा
पवनी : पवनी तालुक्यातील मांगली (चौ.) नदीपात्रातून परवानगी नसतानाही खुलेआम जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. या संबंधाने शिवसेना पक्षासह अन्य नागरिकांनी याची तक्रार तालुका प्रशासनाला देवूनही या प्रकाराकडे कानाडोळा केला जात आहे. रेती माफियांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मांगली चौ. नदीघाटावर अवैधरित्या रेतीचे खणन सुरु आहे. रेतीचा उपसा करताना वेळेचे बंधन पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंबंधाने काही नागरिकांनी नदीपात्रातील वाळूघाटात जावून पाहणी केली असता जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. शासकीय संपदेची खुलेआम लुट केली जात आहे. याची माहिती महसूल प्रशासनाला देवूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. रेतीमाफियांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवेदनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय काटेखाये, नरेश बावनकर, राजू ब्राम्हणकर, बाळू फुलबांधे, जयंत मानापुरे, योगराज वैद्य, होमराज जिभकाटे, निकेश संसोर, श्रीधर वैद्य, प्रमोद वैद्य, रमेश बावनकर, मयूर जनबंधू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)