कान्हळगाव रेतीघाट लिलावधारकांचे सीमांकनाबाहेर रेतीचे खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:52+5:302021-05-11T04:37:52+5:30

: दररोज लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मौजा कान्हळगाव (करडी) येथील शासकीय भू. क्र. ३७४ ...

Sand mining outside the boundaries of Kanhalgaon sand dune auctioneers | कान्हळगाव रेतीघाट लिलावधारकांचे सीमांकनाबाहेर रेतीचे खनन

कान्हळगाव रेतीघाट लिलावधारकांचे सीमांकनाबाहेर रेतीचे खनन

: दररोज लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील मौजा कान्हळगाव (करडी) येथील शासकीय भू. क्र. ३७४ मधील रेतीचा लिलाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही माहिन्यांपूर्वी करण्यात आला. परंतु, रेतीघाट लिलावधारक हे मंजूर झालेल्या गटाऐवजी मौजा कान्हळगाव येथील राजकारणी व्यक्तीशी संगनमत करून दुसरे शासकीय भू. क्र. ३१६ व ३१८ मधून अवैधरीत्या जेसीबीने उपसा करून खासगी व्यक्तीच्या गटामध्ये रेती साठ्याची साठवणूक करीत आहेत. दररोज ४० ते ५० टिप्परमध्ये ओव्हरलोड रेती भरून कोका, ढिवरवाडा तसेच केसलवाडा मार्गे जंगलातून अवैध वाहतूक होत आहे. यामध्ये अधिकारी मासिक चिरीमिरी घेऊन मदत करीत असल्याची चर्चा आहे.

वास्तविक पाहता कोका तसेच ढिवरवाडा जंगलातील चंद्रपूर व पलाडी रस्त्याची वाहतूक क्षमता १० टनांपेक्षा जास्त नाही. असे असताना सुद्धा या रस्त्यावरून ४० ते ५० टन वजनी टिप्परची वाहतूक कशी होते, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. परंतु, एकदाही ओव्हरलोड टिप्परवर कारवाई होताना दिसत नाही. अभयारण्यातून होणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव वाहनांमुळे वन्यजिवांना धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय पर्यटकांना वाहतुकीमुळे निसर्गाचा आनंद घेताना अडचणींचा सामना करावा लागतो तो वेगळाच. अवैध भरधाव व ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामध्ये कोका अभयारण्यातील एका अधिकाऱ्याची हातमिळवणी असल्याचे बोलले जात आहे.

सायंकाळच्या सुमारास अधिकाऱ्यांसोबत चंद्रपूर येथील हॉटेलमध्ये ओली पार्टी होत असल्याची खमंग चर्चा परिसरात आहे. यामुळे दररोज लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. अधिकारी आर्थिक व्यवहारात गुंतल्यामुळे सदर बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. खुलेआम चोरटा व्यापार सुरू असताना जिल्हा खनिकर्म व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे मौन शंकांना वाव देणारे आहे.

मौजा कान्हळगाव येथील लिलाव झालेल्या रेतीघाटाच्या आड सुरू असलेला गैरप्रकार त्वरित थांबविण्यात यावा, सीमांकना बाहेरून होत असलेले अवैध रेतीचे उत्खनन, वाहतूक, साठवणूक प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र शेंडे व मुंढरी तसेच कान्हळगाव येथील नागरिकांकडून होते? आहे. आता रेती लिलावधारकांवर शासन, प्रशासनाकडून कारवाई होईल काय, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संगनमताने रॉयल्टीचे गौडबंगाल व वसुली

लिलावधारक रेतीघाट मालकाचे जिल्हा व स्थानिक स्तरावरील काही अधिकाऱ्यांशी संबंध असल्याने कान्हळगाव रेतीघाटावर रेतीचे गौडबंगाल सुरू आहे. प्रत्येक वाहनामागे अधिकाऱ्यांना मासिक चिरीमिरी देऊन विना राॅयल्टीने टिप्पर भरून देत आहेत. घाटधारक हे टिप्पर मालकांना पहिली फेरी राॅयल्टी घेऊन भरून देतात. त्याच राॅयल्टीवर दुसरी फेरी भरून देतात. त्यामधील मलई प्रत्येक टिप्परमागे अधिकाऱ्यांना दिली जाते. ही बाबसुद्धा लपून राहिलेली नसून, परिसरात चांगलीच चर्चेत आहे.

कोट बॉक्स

'कान्हळगाव रेतीघाटाचे सीमांकन करण्याचे पत्र मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहे. सीमांकनाबाहेरील रेतीची चोरी होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.'

- डी. सी. बोंबर्डे, तहसीलदार मोहाडी

Web Title: Sand mining outside the boundaries of Kanhalgaon sand dune auctioneers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.