‘डीएपी‘ खतात आढळली रेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:19 IST2016-08-11T00:19:50+5:302016-08-11T00:19:50+5:30
डी.ए.पी. खताच्या पोतीमध्ये चक्क रेती आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खताचे नमुने तपासणीकरिता कृषी विभागाच्या चमुने घेतले आहेत.

‘डीएपी‘ खतात आढळली रेती
सिहोरा परिसरातील प्रकार : कृषी सहाय्यकाने केली तपासणी, शेतकऱ्यांमध्ये संताप
चुल्हाड (सिहोरा) : डी.ए.पी. खताच्या पोतीमध्ये चक्क रेती आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खताचे नमुने तपासणीकरिता कृषी विभागाच्या चमुने घेतले आहेत.
‘डी.ए.पी. ग्रोमर गोदावरी’ नामक खताचे उत्पादन आंध्रप्रदेशातील कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या कंपनीचे खत सिहोरा परिसरातील कृषी केंद्रधारकांनी खरेदी केले असून शेतकऱ्यांना खताची खरेदी केली आहे. परसवाडा येथील अंकुश किसन हुड या शेतकऱ्यांनी वांगे भाजीपाला रोपाची वाढ करण्यासाठी डी.ए.पी. ग्रोमर गोदावरी नामक खताची खरेदी केली.या खताचे पाण्यात मिश्रण केले असता थराला रेती आढळून आली आहे. ५० किलो वजन असणाऱ्या या बॅगमध्ये ३ ते ५ किलो रेती आढळून आली आहे. खतात आढळणारी रेती भाजीपाल्यांच्या पिकांसाठी धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणी सुरु झाली आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रधारकांना माहिती दिली आहे. कृषी केंद्र धारकांनी खत विक्रेते कंपनी चे एजंट यांना माहिती देवून विचारणा केली आहे. परंतु कंपनीमार्फत खत विक्री व बंदी आदी विषयावर ठोस निर्देश कृषी केंद्र धारकांना देण्यात आलेले नाही. दरम्यान राज्य शासनाने खताचे किमतीत १० टक्के राशी कमी केली आहे. परंतु कृषी केंद्रधारक या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना देत नाही.
यामुळे शेतकऱ्यांची लुट होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान खतात रेती आढळल्याने शेतकरी चांगलेच चक्रावले आहे. ही रेती शेतीला उपयुक्त नाही. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांचे शेतात डी.ए.पी. ग्रोमर गोदावरी नामक खताची बॅग तपासली असता रेती आढळून आली आहे. खत व रेती तपासणीकरिता पाठविण्यात येणार आहे.
- एच.एन. पडारे
कृषी सहाय्यक सिहोरा
वांगे या भाजीपाल्यांचे रोपटे वाढविण्यासाठी रेतीमिश्रित खताची फवारणी धोकादायक आहे. यामुळे उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता असून खताची चौकशी झाली पाहिजे.
- अंकुश हुड
शेतकरी, परसवाडा
खतात रेती आढळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आहे. ही बाब स्थानिक आमदार यांचे निदर्शनास आणणार आहे.
- बंटी बानेवार
महासचिव, भाजप, तुमसर.