रेती तस्करांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला
By Admin | Updated: June 11, 2016 00:32 IST2016-06-11T00:32:10+5:302016-06-11T00:32:10+5:30
रेतीची अवैध चोरी करणाऱ्या तस्करांनी चोरी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला...

रेती तस्करांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला
गुन्हा दाखल : मऱ्हेगाव नदीघाटावरील घटना
पालांदूर : रेतीची अवैध चोरी करणाऱ्या तस्करांनी चोरी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे हे थोडक्यात बचावले. ही घटना मऱ्हेगाव घाटात गुरूवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी भादंवि ३५३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
लाखनीचे तहसिलदार राजीव शक्करवार यांच्या आदेशाने अवैध रेती उत्खनन रोखण्याकरिता फिरते पथक नेमले आहे. पालांदूर परिसरात मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, किटाडीचे तलाठी एस. जी. आकनुरवार, पालांदूरचे नरेश पडोळे कोतवाल संतोष मडावी, डी. एन. शेंडे यांनी मऱ्हेगाव रेतीघाट तपासणी करताना प्रस्तावित रेतीघाट वगळून तावशीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याकडील नदीपात्रात ३ ट्रॅक्टरने रेती उत्खनन करताना दिसले. मंडळ अधिकारी गिऱ्हेपुंजे व सहकारी कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकांना रेतीघाट वगळून रेती कशी भरत आहात असे विचारून तपासणी केली असता त्यांच्याजवळ रेती वाहतूक परवाना नव्हता. ही माहिती तहसिलदार शक्करवार यांना भ्रमणध्वनीवरुन देऊन ट्रॅक्टर चालकावर दंड भरण्यासंबंधी सुचना दिली.
दरम्यान नितीन रणदिवे जेवनाळा याने हातात पावडा घेऊन मारण्याकरिता अंगावर धावून आला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. धनराज लंजे यानेही धमकी देऊन ट्रॅक्टर रिकामे केले. (वार्ताहर)