सिलेगावात खाऱ्या पाण्याचे स्रोत
By Admin | Updated: September 26, 2016 00:51 IST2016-09-26T00:51:40+5:302016-09-26T00:51:40+5:30
अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिलेगाव येथील गावकऱ्यांना गोड व पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सिलेगावात खाऱ्या पाण्याचे स्रोत
गोड पाण्यासाठी भटकंती : अनेक त्रस्त गावकऱ्यांनी गाव सोडले, पाणी पुरवठा योजना बंद
चुल्हाड (सिहोरा) : अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिलेगाव येथील गावकऱ्यांना गोड व पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रोत असल्याने प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक गावकऱ्यांनी गाव सोडले आहे. स्वतंत्र नळ योजना मंजुर करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे.
पंचायत समिती क्षेत्र असलेल्या सिलेगाव येथील नागरिकांची पिण्याचे पाण्याची असणारी समस्या गंभीरतेने आजवर सोडविण्यात आली नाही. या गावात पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करणाऱ्या साधनाची नोंद शासकीय दस्तऐवजात आहे. यामुळे गावात पाणीटंचाई नाही, असे चित्र निदर्शनास येत आहे. या गावात विहीर व हातपंप आहेत. गावात पाण्याचा विपुल व मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु गावात उपलब्ध असणारी जलधारा पिण्यायोग्य नाही. गावात संपूर्ण गावभर खाऱ्या पाण्याचे स्त्रोत आहेत. या पाण्याचा उपयोग गावकरी आंघोड, कापड धुणे तथा अन्य कामासाठी करित आहेत. पिण्याचे पाणी गावापासून १ कि़मी. अंतरावर असलेल्या शेत शिवारातील विहीरमधून आणले जात आहेत. यामुळे या विहिरीवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जोड पाण्याचे स्त्रोत शेत शिवारात असणाऱ्या विहिरीत असल्याने शेतकऱ्यांचे सहकार्य गावकऱ्यांना प्राप्त होत आहे. दरम्यान गावात प्राप्त होणारे पाण्याची चव जनावरे घेत नाहीत. त्यांचे पिण्याचे पाणी याच विहिरीमधून आणले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावात जटील व गंभीर समस्या गावकरी अनुभवत असताना स्वतंत्र नळ योजना मंजुरीसाठी गंभीरतेने प्रयत्न करण्यात आले नाही. गावात असणारी पिण्याचे पाण्याची प्रमुख समस्या जिल्हा प्रशासनाने सोडविली नसल्याने अनेक नागरिकांनी गाव सोडले आहे. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना पाणी प्राप्त होत असताना योजनेला विज वितरण कंपनीचा शॉक बसला आहे. अंदाजे ९ लाख रूपयाचे विजेचे देयकांची थकबाकी आहे. (वार्ताहर)