शिक्षण विभागातील रेकॉर्डची विक्री
By Admin | Updated: May 7, 2015 00:24 IST2015-05-07T00:24:50+5:302015-05-07T00:24:50+5:30
तुमसर पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या संबंधीत अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे व काही शासकीय अभिलेख

शिक्षण विभागातील रेकॉर्डची विक्री
मोहन भोयर तुमसर
तुमसर पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या संबंधीत अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे व काही शासकीय अभिलेख कोणतीही पूर्व परवानगी न घेता निर्लेखीकरण करण्यात आले. ही कागदपत्रे भंडारा येथील एका कंत्राटदाराला केवळ सहा हजारात विकल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश सभापतींनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. यामुळे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तुमसर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील जुना रेकॉर्ड यात निवृत शिक्षकांच्या सेवापुस्तिका तथा इतर शासकीय अभिलेख गहाळ असल्याच्या तक्रारी सभापती कलाम शेख यांना प्राप्त झाली. अभिलेख कक्षातील सर्व जुने रेकॉर्ड आहेत किंवा नाही याची खात्री करून घेण्यासंबंधात सभापतींनी प्राप्त तक्रारीवरून शिक्षण विभागातील अधीक्षकांना स्पष्टीकरण मागितले. या विक्रीपूर्वी पंचायत समितीची परवानगी घेण्यात आली होती काय? याची चौकशी व विकलेल्या अभिलेखाची रक्कम कोणत्या खात्यात जमा केली याची चौकशी करून सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश सभापती कलाम शेख यांनी दिले.
पंचायत समिती कार्यालयात शिक्षण विभागात कार्यरत अधीक्षक एम.एस. चोपडे यांनी अंदाजे १३ डिसेंबर २०१४ ला शिक्षण विभागांतर्गत जुने अभिलेख निर्लेखीकरण करण्याचे तोंडी निर्देश वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग टी.बी. पटले यांना तथा विभागातील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यासमक्ष दिले होते. जुने अभिलेख निर्लेखीकरण करून त्यातील काही रेकॉर्ड एम.एस. चोपडे यांनी भंडारा येथील रद्दी विक्रेत्यास सहा हजारात विकण्यात आले. सदर रक्कम कोणत्या विभागात जमा केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
जुने रेकॉर्ड विकण्याबाबत किंवा निर्लेखणाबाबत पंचायत समिती किंवा गट शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली किंवा नाही याची माहिती नाही, असे बयाण टी.बी. पटले व परिचर एन.एन. कटरे यांनी दिले आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जुने अभिलेख निर्लेखीकरण करताना पंचायत समितीच्या मासिक सभेत तथा खंडविकास अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य असते. या शासकीय दस्तऐवजात सेवानिवृत्त शिक्षकांच्या गहाळ सेवापुस्तीका तथा इतर महत्वपूर्ण दस्ताऐवज होता असे समजते. आता हे शिक्षक फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.
या प्रकरणी पंचायत समिती सभापतींनी अहवाल मागितला असल्याने प्र्रकरणाकडे तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना तोंडी निर्देश दिले नाही. रेकॉर्ड निर्लेखीकरण करण्याची परवानगी घेणे अनिवार्य असते. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-कलाम शेख
सभापती, पंचायत समिती तुमसर.
शिक्षण विभागातील अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांना तोंडी निर्देश सभापतींनी दिले असे माझ्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी मला सांगितले. त्या अनुषंगाने अभिलेख निर्लेखीकरण करण्यात आले.
-सी.के. नंदनवार
गटशिक्षणाधिकारी, तुमसर