साकोलीत सुगंधीत तंबाखुची खुलेआम विक्री
By Admin | Updated: September 4, 2015 00:14 IST2015-09-04T00:14:30+5:302015-09-04T00:14:30+5:30
शासनाने सुगंधीत तंबाखुसह गुटखावर महाराष्ट्रात बंदी आणली आहे. मात्र साकोलीत सुंगधीत तंबाखुची खुलेआम विक्री सुरू आहे.

साकोलीत सुगंधीत तंबाखुची खुलेआम विक्री
चौकशी नावापुरती : गोदामात साठा पडून
साकोली : शासनाने सुगंधीत तंबाखुसह गुटखावर महाराष्ट्रात बंदी आणली आहे. मात्र साकोलीत सुंगधीत तंबाखुची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्न व औषधी प्रशासन कारवाई करताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे साकोलीतील पानटपऱ्यावर खुलेआम खर्रा विक्री सुरु आहे. विद्यार्थ्यांपासून वृध्दांपर्यत खर्रा दिसत असून कर्करोगाला आमंत्रण देणे सुरू आहे.
साकोली तालुक्यात हजारो पानटपऱ्या असून या पानटपऱ्यातुन दररोज सुगंधीत तंबाखुचा खर्ऱ्याची खुलेआम विक्री होते. या पानटपऱ्यावर ही सुगंधीत तंबाखु सायकलवर किंवा दुचाकीने खुलेआम आणून दिले जाते. अन्न व औषधी विभागामार्फत कागदोपत्री कार्यवाही केली जात असून साकोली येथील मोठे दुकानदार ही तंबाखु गोदामामध्ये स्टॉक करुन ठेवत आहेत. एवढेच नाहीतर त्यांचेकडून सुपारी व इतर पानटपरीचे साहित्य खरेदी केले नाही तर तेही सुगंधी तंबाखु देत नसल्याचे चित्र आहे. साकोली येथे दोन वर्षापुर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे धाड टाकून हजारो रुपयांची सुगंधीत तंबाखु जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अशी कार्यवाही झाली नाही. मात्र सुरवातीपेक्षा आता तंबाखू विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पानटपरीवर मुलांचा घोळखा
शाळेच्या वेळेवर व सुट्टी झाल्यावर शाळा परिसरातील व पानटपरीवर विद्यार्थ्यांची खर्रा खाण्यासाठी गर्दी जमते. हे विद्यार्थी खर्रा शाळेतही घेवून जातात. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांची तपासणी करीत नसल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच फावते.
नागपुरहून आणतात तंबाखू
साकोली येथील व्यापारी नागपुरवरुन ही सुुंगधी तंबाखु खरेदी करुन साकोली येथे आणून विक्री करतात. मग नागपूरवरुन साकोलीपर्यंत ही तंबाखू कशी येते याचा तपास करणे गरजेचे आहे.
(तालुका प्रतिनिधी)