साकोली तालुक्यात पाच कोटी रूपयांचे चुकारे अडले

By Admin | Updated: July 22, 2016 00:47 IST2016-07-22T00:47:03+5:302016-07-22T00:47:03+5:30

सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली.

In Sakoli taluka, cash worth Rs five crore was stuck | साकोली तालुक्यात पाच कोटी रूपयांचे चुकारे अडले

साकोली तालुक्यात पाच कोटी रूपयांचे चुकारे अडले

१६ तासांचे भारनियमन सुरू : हेच का अच्छे दिन, शेतकऱ्यांचा सवाल
संजय साठवणे साकोली
सर्वसामान्याचा सर्वांगिण विकास करू, असे अच्छे दिनचे स्वप्न दाखवित भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र ऐन पावसाळ्यात १६ तासांचे भारनियमन आणि धानाचे पाच कोटी रूपयांचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न पडला आहे.
शेतकऱ्यांनी विहीर व बोरवेल करून शेतातच सिंचनाची सोय केली. यावर्षी पावसाळ्यातही १६ तासाच्या भारनियमाने शेतकरी खचला आहे. साकोली तालुक्यात केवळ ३ टक्केच रोवणी झाली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. ज्यांच्याकडे विहीरी व बोरवेल आहेत त्या शेतकऱ्यांचीही रोवणी पुर्णपणे झालेली नाही. कृषीपंपाला आठ तासच विद्युत पुरवठा होत आहे.
पावसाअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी कसेबसे धानाची लागवड केली. उन्हाळी धान निघाल्यानंतर धानाला भाव नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य घरी ठेवून काय करायचे म्हणून काहींनी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली. काहींनी खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. यावेळी शासनातर्फे धानाचे दर प्रति क्विंटल १४१० रूपये व २०० रूपये बोनस, असे जाहीर केले होते.
श्रीराम सहकारी संस्था साकोलीतर्फे साकोली व विर्शी या दोन केंद्राअंतर्गत साकोली केंद्रात ३९ हजार २३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
यावेळी २ कोटी ७० लक्ष ९ हजार ३०० रूपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले तर ३ कोटी ६० लक्ष ६४ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक असून विर्शी केंद्राअंतर्गत १७ हजार ५०६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
यावेळी १ कोटी ३५ लाख ९२ हजार २३० रूपयाचे चुकारे झाले असून १ कोटी ४५ लाख ५२ हजार रूपयाचे चुकारे शिल्लक आहेत. साकोली व विर्शी केंद्र मिळून ५ कोटी रूपयांचे चुकारे अडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामात शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे.

 

Web Title: In Sakoli taluka, cash worth Rs five crore was stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.