साकोली नगरपंचायतीची प्रशासनाकडून तयारी सुरु
By Admin | Updated: July 7, 2014 23:25 IST2014-07-07T23:25:03+5:302014-07-07T23:25:03+5:30
येथील ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये होणार हे आता पुन्हा एकदा निश्चित झाले असून शासन स्तरावरून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. शासनातर्फे एक महिन्यापूर्वी साकोली नगरपंचायत

साकोली नगरपंचायतीची प्रशासनाकडून तयारी सुरु
साकोली : येथील ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये होणार हे आता पुन्हा एकदा निश्चित झाले असून शासन स्तरावरून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. शासनातर्फे एक महिन्यापूर्वी साकोली नगरपंचायत विषयी जाहीरनामा ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आला होता व आक्षेपाची वेळ ३० दिवसांची होती.
माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व मोहाडी या तीन ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला असून त्यासंबंधाची तयारी शासनस्तरावरून सुरु झाली आहे. यात साकोलीची ग्रामपंचायत ही सर्वात जुनी व मोठी असून साकोलीच्या ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होणार हे आता जवळजवळ नक्कीझाले आहे.
मागील महिन्यात तहसील कार्यालयातून या संदर्भात एक जाहिरनामा ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या जाहिरनाम्यानुसार साकोली नगरपंचायत संदर्भात जरकुणाला आक्षेप घ्यायचा असल्यास ३० जून ही शेवटची तारीख होती व हे आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे पाठवायचे होते. यावरून शासन साकोली नगरपंचायतच्या प्रशासकीय तयारीला लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)