साकोलीत २५२ बालके कुपोषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: December 8, 2014 22:30 IST2014-12-08T22:30:40+5:302014-12-08T22:30:40+5:30
महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या साकोली तालुक्यातील १७० अंगणवाड्यातील एकूण २५२ बालके कुपोषणाच्या विळख्यात असून शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या

साकोलीत २५२ बालके कुपोषणाच्या विळख्यात
संजय साठवणे - साकोली
महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या साकोली तालुक्यातील १७० अंगणवाड्यातील एकूण २५२ बालके कुपोषणाच्या विळख्यात असून शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आहारावर व उपाययोजनावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून राबविण्यात येत आहे. या योजनामुळे मुलांच्या विकासात लक्ष्यणीय सुधारणा झाली, असे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत असले तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बाल पोषण पद्धतीमध्येच व्यापक बदल करण्याची गरज आहे.
साकोली तालुक्यातील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील ४९ बालके ही तीव्र कुपोषणाच्या तर २०३ बालके मध्यम कुपोषणाच्या विळख्यात असल्याची नोंद आहे. या कार्यालया अंतर्गत एकूण १५० मोठ्या अंगणवाड्या तर २० मिनी अंगणवाड्या असून यामुळे जवळपास बारा हजार विद्यार्थी अंगणवाडीचा लाभ घेत आहेत.
ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडीतील लाभार्थी गरोदर माता व स्तनदामता तीव्र कमी वजनाची बालके यांना घरपोच आहार पुरविल्या जाते. शासन अशा विविध योजनाच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करीत असला तरी कुपोषणाचा नायनाट अजुनपर्यंत होऊ शकला नाही, हे विशेष.
अंगणवाडीत शौचालयेच नाहीत
साकोली तालुक्यातील १७० अंगणवाड्यापैकी ५० अंगणवाड्यात शौचालयेच नाहीत. राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियान जोरावर असताना या अंगणवाड्यामध्ये प्रसाधनगृह व शौलचाये नसते म्हणजे आश्चर्यच आहे. बालक दिनापासून राज्यात बालक स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. घर आणि परिसरात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी बालकांची स्वच्छतादुत म्हणून निवड करण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन साध्य करण्यासाठी शाळा व बालके हे महत्वाचे घटक गृहीत धरून अनेक उपक्रम राबविण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. जेवणाआधी व जेवनानंतर तसेच प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर हात धुण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. मात्र साकोली तालुक्यातील अंगणवाड्यामध्ये प्रसाधन गृह व शौचालय नसल्याने या स्वच्छता अभियानाचे धिंडवडे निघाले आहेत.