दिवाळीच्या साहित्यांनी सजली बाजारपेठ
By Admin | Updated: November 9, 2015 04:51 IST2015-11-09T04:51:43+5:302015-11-09T04:51:43+5:30
दिवाळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यांनी

दिवाळीच्या साहित्यांनी सजली बाजारपेठ
भंडारा : दिवाळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यांनी गजबजून गेली आहे. रांगोळी, पणत्या, रोषनाई, आकाश दिवे, फटाके, रंगबिरंगी तोरणे यासह अन्य साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. ग्राहकही गर्दी करत आहे. उद्या सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या ‘धनत्रयोदशी’ला सोन्याचांदीचा व्यवहारही मोठ्या प्रमाणात होईल, अशी आशा आहे.
दिवाळी म्हटली की, आबाल वृद्धांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसतो. विशेषत: बच्चे कंपनीची औरच मौजमजा असते. फटाके, नवनवीन कपडे, मिष्ठान्न याची विशेष विक्री बाजारात होताना दिसते. भंडाऱ्यात दीडशे पेक्षा जास्त कापड विक्रीची दुकाने आहेत. दिवाळीचा सण तोंडावर असताना ग्राहकांनी हळूहळू खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेताना दिसत आहे. विशेषत: गृहिणींची गर्दी अधिक आहे. दिवाळीचा सण महिन्याच्या चवथ्या आठवड्यात असला तरी पगारदार वर्ग खरेदीसाठी मागेपुढे पहात नाही.
धानपिक हातात येण्यापुर्वीच दिवाळीचा सण असल्याने दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्नही बळीराजासमोर आहे. त्यातही अळीचा प्रादुर्भाव धानावर झाल्याने हातातले पीक जाणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असल्याने तोंडावर असलेला दिवाळीचा सण साजरातरी कसा करायचा या विवंचनेत बळीराजा दिसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांची संख्या आहे. बीपीएल कुटूंबाचीही संख्या मोठी आहे. दिवाळी असो की दसरा त्यांच्यासाठी सर्वच दिवस सारखे आहे. हातावर कमावणे व पानावर खाणे, अशीच स्थिती हजारो लोकांची आहे. त्यामुळे दिवाळी हा फक्त चांगल्या कमावत्या घरांसाठीचा सण होवून बसला काय, असा सवालही उपस्थित होतो. साधारण कुटूंबातल्या लोकांची दिवाळी त्यांच्याच इच्छा आकांक्षा इतकीच मर्यादित असते. दिवाळीत काहीतरी नवीन घ्यावे, या हेतूने सर्वच स्तरातील ग्राहक बाजारपेठेत गर्दी करीत आहे. शहरातील बाजारपेठेत विविध साहित्यांची विक्री जोमात सुरू आहे. (प्रतिनिधी)
पणत्यांच्या किमतीतही वाढ
४दिवाळी हा प्रकाश पर्वाचा सण म्हणून ओळखला जातो. रावणावर विजय संपादन करून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते. त्या विजयाची व प्रभू रामचंद्राचे पुनरागमन म्हणून विजयोत्सव या नात्याने हजारो दिवांची आरास करून उत्सव साजरा करण्यात आला होता. दरवर्षी अश्विन अमावशेला दिवाळीचा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिव्यांच्या रोषनाईला विशेष महत्व प्राप्त झाले. दारोदारी दिवे लावून विजयोत्सवाचा व लक्ष्मी पूजनाचा उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी पणत्यांचे दरही वाढलेले आहेत. भंडारा शहरातील बाजारात सध्या पणत्या १५ ते १८ रूपये डझन याप्रमाणे विकले जात आहे.