पोलीस पाटलानेच केली रेतीची चोरी

By Admin | Updated: December 10, 2015 00:45 IST2015-12-10T00:45:15+5:302015-12-10T00:45:15+5:30

गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून गावात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या पोलीस पाटलाची त्यानेच रेतीची चोरटी वाहतूक करून ....

Sailboat stolen by police constable | पोलीस पाटलानेच केली रेतीची चोरी

पोलीस पाटलानेच केली रेतीची चोरी


विरली (बु.) : गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून गावात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या पोलीस पाटलाची त्यानेच रेतीची चोरटी वाहतूक करून आपल्या पदाला काळीमा फासल्याचा प्रकार जवळच्या उमरी (चौ.) येथे उघडकीस आला. याप्रकरणी ट्रॅक्टर जप्त केला आहे.
उमरी (चौ.) येथील नदीपात्रातून रात्रीच्या वेळी रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गावकऱ्यांना कुणकुण लागली होती. त्यामुळे येथील सरपंच प्रमोद खरकाटे, उपसरपंच राहुल सोनटक्के आणि काही जागरूक गावकऱ्यांनी रात्री पाळत ठेवून रेतीचोरांना पकडण्याचा चंग बांधला. दि. ८ डिसेंबरला रात्री ११ च्या सुमारास नदीपात्रातून रेती भरलेला ट्रॅक्टर येत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी तातडीने बैलगाडी आडवी टाकून ट्रॅक्टर अडवला. तेव्हा तो ट्रॅक्टर खुद्द गावचे पोलीस पाटील प्रफुल्ल प्रभाकर सावरबांधे यांच्या मालकीचा असल्याचे आणि स्वत: पोलीस पाटीलच ट्रॅक्टर चालवित असल्याचे आढळले. समोर आरोपी म्हणून पोलीस पाटील दिसताच गावकरी क्षणभर भांबावले. मात्र लगेच या धक्क्यातून सावरत आरोपी पोलीस पाटलांना रेती भरलेला ट्रॅक्टर ग्रामपंचायतमध्ये उभा करण्याची विनंती केली. मात्र पोलीस पाटील सावरबांधे यांनी गावकऱ्यांची मागणी धुडकावून ट्रॅक्टर सरळ आपल्या घरी उभा करून त्यातील रेती उपसली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी घटनेची माहिती पवनी पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करून आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त केला. त्याचप्रमाणे आरोपीला अटक करून जामीनावर सोडण्यात आले. पुढील तपास बिट जमादार गोंडाणे, पोलीस कॉन्स्टेबल चुटे करीत आहेत. या गैरप्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलीस पाटील सावरबांधे यांना हटविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sailboat stolen by police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.