२४ तासानंतर आढळला सचिनचा मृतदेह

By Admin | Updated: March 9, 2017 00:32 IST2017-03-09T00:32:55+5:302017-03-09T00:32:55+5:30

वैनगंगा नदीच्या जुन्या कारधा पुलावरुन नदीत उडी घेतलेल्या युवकाचा मृतदेह आज शोधून काढण्यात पोलीस व शोध पथकाला यश आले.

Sachin's body found after 24 hours | २४ तासानंतर आढळला सचिनचा मृतदेह

२४ तासानंतर आढळला सचिनचा मृतदेह

तरूणाची आत्महत्या : पोलीस, शोधपथकाचे शर्थीचे प्रयत्न
भंडारा : वैनगंगा नदीच्या जुन्या कारधा पुलावरुन नदीत उडी घेतलेल्या युवकाचा मृतदेह आज शोधून काढण्यात पोलीस व शोध पथकाला यश आले. तब्बल २४ तासानंतर आत्महत्या करणाऱ्या सचिन हरिभाऊ घारगडे या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात आढळला.
शहरातील खात रोड मार्गावरील गंगानगर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार हरीभाऊ घारगडे यांचा सचिन हा मुलगा होय. सचिनने शिक्षणासोबतच कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी पाळीव जनावरे, पक्षी पालनाचा व्यवसाय सुरु केला. मृदुभाषी सचिनने या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली.
मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास सचिनने घरी जेवन केल्यानंतर कुणालाही न सांगता तो घरुन निघाला. एम एच ३६ एम ८३०३ या दुचाकीने त्याने कारधा येथील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन कारधाकडे दोनवेळेस चक्कर मारली. त्यानंतर त्याने २ वाजताच्या सुमारास लहान पुलावर दुचाकी उभी ठेवून अचानक त्याने वैनगंगा नदीपात्रात उडी मारली. यावेळी तेथून रहदारी करणाऱ्या कुणाला कळायच्या आतच युवकाने नदीत उडी मारल्याने अनेकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला. याची माहिती नागरिकांनी कारधा पोलिसांना दिली.
माहितीवरुन कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एच. इंगोले यांनी तातडीने मदतकार्य करणाऱ्या पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबविली. मात्र रात्री अंधार झाल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाल्याने मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळी चार डोंगे व आपत्ती व्यवस्थापनाची एक यांच्यासह सुमारे २५ लोकांच्या शोधमोहिम पथकाच्या मदतीने पुन्हा शोधमोहिम राबविली.
स्थानिक ढिवरबांधव व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने नदीपात्रात उडी घेणाऱ्या युवकाचा शोध घेण्यात आला. आज बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सचिनचा मृतदेह नदीपात्रातून काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सचिनच्या मागे आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)

दुचाकीवरुन कुटुंबीयांना मिळाली माहिती
सचिनने नेलेली दुचाकी नदी पुलावर ठेवली होती. ती दुचाकी त्याच्या मामाची असल्याने ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून दुचाकी नदीवर असल्याचे सांगितले. एका युवकाने उडी घेतल्याची चर्चा शहरात व पोलिसात पोहचल्याने शोध मोहिम सुरु होती. सचिनच्या कुटुंबीयांनी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता. तो बंद आढळून येत होता. यामुळे सचिनने आत्महत्या केली असावी असा कयास लावण्यात येत होता. सचिनच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Web Title: Sachin's body found after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.