ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा रुग्णशय्येवर

By Admin | Updated: July 26, 2015 01:06 IST2015-07-26T01:06:07+5:302015-07-26T01:06:07+5:30

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे व सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवा खिळखिळी झाली आहे.

Rural Hospital's health service on sick patients | ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा रुग्णशय्येवर

ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा रुग्णशय्येवर

चंदन मोटघरे लाखनी
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे व सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवा खिळखिळी झाली आहे. रुग्णांना भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले जात असते. राज्य शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गरीब व वंचित लोकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही. लाखनी येथे २००० पासून ग्रामीण रुग्णालयाचा प्रारंभ झाल्यापासून वैद्यकीय अधिक्षकाचे पद भरण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही.
राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयात ३०० ते ४०० रूग्णांची तपासणी केली जाते. यात गरोदर मातांचे प्रमाण जास्त असते. महामार्गावरील अपघाताच्या घटना घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब औषधोपचार होत नाही. ७५ टक्के रुग्णांना भंडारा येथे सोयीअभावी रेफर केले जाते. लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी अथवा फिर्यादीच्या तपासणीसाठी रुग्णालयात पाठविल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसतात. लाखनी येथील वैद्यकीय सेवा आॅक्सिजनवर असल्याने लोकांच्या जीवनाशी खेळखंडोबा करण्यात शासकीय अधिकारी मश्गुल असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४ पदे मंजुर आहेत. वैद्यकीय अधिक्षकाचे पद रुग्णालय निर्मितीपासून रिक्त आहे. सद्या एक डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना दिवसभर ड्युटी करावी लागते. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे बीएएमएस डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णालयाचा भार टाकला जातो. तात्पुरती चिकित्सा करण्याचे काम कंत्राटी डॉक्टर करतात.
ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज आहे. दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांची सेवेचे आवश्यकता असतानी त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालय असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यापेक्षा लोक ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात. योग्य तपासणी व औषधोपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांची २ पद रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३ पदे रिक्त असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो.
आरोग्य समिती नावापुरती
ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य समिती नावापुरती आहे. तालुक्यातील नामांकित व स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे समितीच्या सदस्यांना लोकांच्या आरोग्यसेवेशी कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. समितीचे पदाधिकारी व सदस्य बैठकांना उपस्थित राहत नाही. लोकप्रतिनिधी उदासीन असून आ. बाळा काशिवार यांनी ग्रामीण रुग्णालयाचे समस्या जाणून घेतल्या होत्या. त्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. खा. नाना पटोले यांनीही ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे अच्छे दिन केव्हा येणार याची प्रतिक्षा जनतेला आहे.
इमारतीचे हस्तातरण नाही
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन्नी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. २००७ मध्ये कामाला प्रारंभ झाला. अद्यापही इमारतीचे हस्तातरण आरोग्य विभागाकडे झालेले नाही. इमारतीचे उद्घाटन झाले नाही. आॅपरेशन कक्ष निकृष्ट दर्जाचा असल्याने त्याचे दुरूस्ती पाण्याचा निचरा होत नाही. परिसरात पाणी साचलेले असते. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णालयाचे काम अपुर्ण आहे. रंगरंगोटी केलेली नाही. जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीत तडे गेल्यामुळे मागील वर्षी नवीन इमारतीत रुग्णालयांचे स्थानांतरण करण्यात आले होते.
मूलभूत सोयींचा अभाव
ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होतात विद्युत सेवा खंडित झाल्यानंतर दवाखान्यात अंधार असतो. त्यामुळे जनरेटरची निकड आहे. टॉर्चचा वापर करावा लागतो. दवाखान्यात २००८ पासून एक्स-रे मशिन आलेली आहे. ती मशीन सांभाळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नाही. त्यामुळे एक्स-रे मशिन पडून आहे. पंखे नादुरूस्त आहेत. कुलरची गरज आहे. इसीजी मशिन आहे. परंतु टेक्नीशियन नाही. शौचालय व स्वच्छतागृहाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
शवविच्छेदनगृहाचे काम अपूर्ण
ग्रामीण रुग्णालय परिसरात शवविच्छेदन गृहाचे बांधकाम अपुर्ण आहे. मृतकांचे नातेवाईक व डॉक्टरांना लाखोरी रोडवरील शवविच्छेदनगृहात जावे लागते. त्यामुळे परिसरात शवविच्छेदनाची सोय होणे महत्वाचे आहे.
जुनी इमारत धोकादायक
लाखनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू होता. मागील वर्षी नवीन इमारतीत रुग्णालयाची स्थानांतरण करण्यात आले. जुन्या इमारतीला भेगा पडल्या आहेत. स्लॅब पडलेला अवस्थेत आहे. जुनी उत्तर बुनियादी प्राथमिक शाळेची इमारत व प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाडणे आवश्यक असून परिसर मोकळा करून तेथे पार्किंग व गार्डन तयार करता येणे शक्य आहे.

Web Title: Rural Hospital's health service on sick patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.