ग्रामीण विकासाचे कामकाज थांबले
By Admin | Updated: September 15, 2016 00:28 IST2016-09-15T00:28:25+5:302016-09-15T00:28:25+5:30
ग्रामसेवकाला करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दोषीविरुद्ध दुय्यम स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देण्यात आले आहे.

ग्रामीण विकासाचे कामकाज थांबले
शेकडो कर्मचारी संपात सहभागी : प्रकरण मांगली येथील ग्रामसेवकाला मारहाणीचे
भंडारा : ग्रामसेवकाला करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दोषीविरुद्ध दुय्यम स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देण्यात आले आहे. मारहाणीत दोषींना अटक करून न्याय द्यावा, या मागणीसाठी बुधवारी कृती समितीच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. मागील १५ दिवसापासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले असल्याने ग्रामीण विकासाचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला. या संपाचे नेतृत्व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल, प्रभाकर कळंबे, अतूल वर्मा, मनिष वहाने, विजय ठवकर, गणेश साळुंके, अशपाक शेख, रविंद्र मेश्राम, सतिश मारबते, गोपाल कारेमोरे, रविंद्र तायडे, शिवपाल भाजीपाले यांनी केले. पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मांगली येथील दत्ता जाधव या ग्रामसेवकाला ही मारहाण करण्यात आली.
तंटामुक्त समितीची सभा सुरू असताना तेथे संतप्त ग्रामस्थांनी तैनात पोलिसांसह ग्रामसेवक व सरपंचांना ही मारहाण करण्यात आलेली आहे. यावेळी सभेचे छायाचित्राणासाठी असलेला कॅमेरा नागरिकांनी फोडला. एवढ्यावरच ते न थांबता त्यांनी सभेचे इतिवृत्त लिहीत असलेल्या रजिस्टरला हिसकावून घेत त्याला फाडण्यात आले. नागरिकांच्या संतापाला सामोरे जाण्याऐवजी तैनातीवरील पोलिसांनी जीव मुठीत घेवून तेथून पळ काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणाची माहिती सदर ग्रामसेवक जाधव यांनी भ्रमणध्वनीवर पवनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांना दिली. मात्र, त्यांनी प्रशासनाकडून ग्रामसेवक जाधव यांना संरक्षण देण्याऐवजी वेळ मारून नेण्याचा प्रकार केल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
याप्रकरणात मारहाण करणारे आरोपी मोकाट असून त्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेनी केली.
मात्र, कोणावरही अटकेची कारवाई करण्यात आलेली नसून यात दोषींना पाठिशी घालीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज बुधवारला जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीमधील वर्ग-३ व वर्ग-४ च्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात ग्रामीण विभागाच्या ग्रामसेवक, आरोग्य, अभियंता, लिपिक व शिपाई यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
पदाधिकारी पडले एकाकी
या संपात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे वर्ग-२ व वर्ग-४ चे अधिकारी व जिल्हा परिषद तथा पंचायत समितीचे पदाधिकारी हेही त्यांच्या कक्षात दिसून आले. मात्र, नेहमी ‘बेल’ मारल्यावर दिमतीला धावून येणारे त्यांचे अधिनस्थ कर्मचारी त्यांच्या दिमतीला आज नव्हते. त्यामुळे त्यांना स्वत:चे काम स्वत:च करावे लागल्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र जिल्हा परिषदमध्ये दिसून आले.
एसपी म्हणतात... नो वर्क, नो पेमेंट
आरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन कामबंद व संप पुकारण्यात आला. आज कर्मचारी संपावर असल्याने ग्रामविकास विभागाचे कामकाज प्रभावीत झाले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लाखनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात ग्रामसेवकांचे कामबंद असल्याने त्यांना ‘नो वर्क, नो पेमेंट’ नुसार कारवाई करण्याचे सुचित केले. या पत्राची प्रत कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. गृहविभगाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधीक्षकांनी ग्रामविकासात ढवळाढवळ करण्याच्या या अफलातून प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.