ग्रामीण भागात मंडईची रेलचेल
By Admin | Updated: October 25, 2014 01:01 IST2014-10-25T01:01:34+5:302014-10-25T01:01:34+5:30
दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी.

ग्रामीण भागात मंडईची रेलचेल
रंजित कांबळे मोहदुरा
दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधुम सुरू होणार आहे. परिणामी ग्रामीण भागात जत्रेचा माहोल दिसणार आहे.
तस बघितले तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण भागात आयोजीत होणाऱ्या मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरु होताच ग्रामीण भागात मोठया प्रमाणात मंडईला सुरुवात होत असते. मंडई निमित्त नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त झाडीपट्टीतील नाटकांना म्हणजेच संचाच्या नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते.
त्याचबरोबर तमाशा, दंडारी, आमदंगल आणि आंबट शौकीनासाठी हंगामे आयोजीत केले जातात. काही का असोना पण मंडई उत्सवामुळे कलावंताना त्यापासून मोठया प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते. मंडईला डेकोरेशनची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात असते. महिनाभरापासून डेकोरशन बुक केले जात असते.
मंडईला पाहुण्याचे आदान - प्रदान होत असते. नातलग एकमेकांच्या गावी मंडईनिमित्त का होईना पण भेटीगाठी घेत असतात. लहान मुलापासून तर तरुण, मोठयांना मंडईचे खास आकर्षण दिसून येते. विशेष करुन तरुण मुला - मुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊ न येणारा ठरतो. मंडई उत्सव तरुण- मुला - मुलीसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे एक केंद्रस्थान सुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्व दिसून येते.
दिवाळी सण सर्वासाठी आनंदाचे, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊ न येणारा सण असतो. आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाचे पर्वणीच घेणारा ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते हे मात्र विशेष.
ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्व असते. सकाळ सत्रापासूनच आप्तस्वकीयांचे येणे-जाणे सुरू होते. विशेष म्हणजे सोयरकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर-वधू यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्यात मंडईच्या बहाण्याने भेटी-गाठी वाढविण्यावर भर दिला जातो. त्यातूनच मोठ्या प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान या उत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल सुद्धा होत असते.