होर्डिंग्जमुक्तीसाठी धावपळ
By Admin | Updated: September 13, 2014 01:04 IST2014-09-13T01:04:59+5:302014-09-13T01:04:59+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हा व पालिका प्रशासनाकडून होर्डिंग्ज....

होर्डिंग्जमुक्तीसाठी धावपळ
भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हा व पालिका प्रशासनाकडून होर्डिंग्ज व बॅनर्स काढण्याची कारवाई सुरू झाली होती. शुक्रवारला आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यात शहरातील चौकाचौकात लागलेले बॅनर आणि होर्डिंग्ज काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते. तरीसुद्धा शहरातील शास्त्री चौकासह अन्य वॉर्डात होर्डिंग्ज व बॅनर्स लटकलेले आहेत. ग्रामीण भागात बॅनर आणि होर्डींग काढण्यात आलेले नाहीत.
मागील आठवडाभरापासून निवडणूक तारखा केव्हा घोषित होतील याकडे तमाम राजकीय पक्षांसह सामान्य जणांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे खिळल्या होत्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तारखांच्या घोषणा होताच निवडणुकीचा बिगूल वाजला. तारखांची घोषणा होण्याची संभावना लक्षात घेता शहरातील बॅनर व होर्डिंग काढण्याची पुर्व तयारी राजकीय पक्षांनी चालविली होती. त्याअंतर्गत शहरातील मुख्य चौकांमध्ये लावलेले होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत बहुतांश होर्डिंग्ज व बॅनर काढण्यात आले होते. यात सर्वाधिक राजकीय पक्षांचे होर्डींग होते.
लोकसभा निवडणूक आटोपताच विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजतील, या तयारीत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या हवसे-नवसे यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपआपले होर्डिंग्ज लावले होते. श्रावण महिना सुरू होताच उत्सवांची रेलचेल सुरू झाली. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी संभावित उमेदवारांनी होर्डिंग्जचा आधार घेतला होता. आचारसंहिता लागू झाल्यामुळे होर्डिंग्जही गायब झाल्या आहेत. (प्रतिनिधी)