२०० मजुरांची सहा महिन्यांपासून रोहयोच्या मजुरीसाठी धावपळ
By Admin | Updated: August 10, 2015 00:22 IST2015-08-10T00:22:56+5:302015-08-10T00:22:56+5:30
रोहयो कामे संपल्यापासून १५ दिवसात मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्याचा कायदा आहे.

२०० मजुरांची सहा महिन्यांपासून रोहयोच्या मजुरीसाठी धावपळ
युवराज गोमासे करडी/पालोरा
रोहयो कामे संपल्यापासून १५ दिवसात मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्याचा कायदा आहे. मात्र मोहाडी तालुक्यातील केसलवाडा पालोरा येथे सहा महिन्यांपासून २०० मजुरांना त्यांच्या हक्काची मजुरी मिळालेली नाही. तालुका प्रशासन प्रकरणी अनभिज्ञता दाखवित असल्याने न्याय मागायचे कुठे, विचारायचे कुणाला, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी न्यायाची गरज आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५ मधील फेब्रुवारी ते जून महिन्यात बेहळे तलाव पांदन रस्त्याचे अकुशल काम हाती घेण्यात आले.
केसलवाडा ग्रामपंचायतीमार्फत काम हाती घेण्यात आली होती. पांदण रस्त्याचे कामावर सुमारे २०० मजुरांनी हजेरी लावली. अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण केले गेले. कामावर प्रत्यक्ष नियंत्रण रोहयो तांत्रिक पॅनल अधिकारी रमेश चौधरी व रोजगार सेवक अरविंद साठवणे यांचे होते.
रस्त्याचे काम जून महिन्यात बंद करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या कामाला आज सहा महिन्याचा कालावधी होत आहे. परंतु मजुरांना अद्यापही त्यांच्या घामाचा पैसा मिळालेला नाही. मजुरांवर पैशाअभावी उपासमारिची वेळ आहे. कामे करूनही मजुरी वेळेवर मिळत नसेल तर शासनाने १५ दिवसात मजुरी देण्याचा कायदा केलाच कशाला, प्रशासनाचे काम तरी कोणते आदी प्रश्न मजुरांकडून विचारली जात आहे. मोहाडी तालुक्याचे प्रशासन प्रकरणी अनभिन्नता दाखवित आहे. प्रकरणच माहित नसल्याचे कारण देत आहे. नागरिक मात्र वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवीत आहेत. बँकेत मजुरी जमा झाली काय म्हणून बँकेकडे चकरा मारीत आहेत. अखेर मजुरांचे हित लक्षात घ्यायचे कुणी, न्याय मिळणार तरी केव्हा आदी मजुरांचे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.मजुरीविषयी प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वाच्या नजरा आहेत.