नळातून निघाले सडक्या सापाचे अवशेष
By Admin | Updated: November 1, 2014 00:39 IST2014-11-01T00:39:12+5:302014-11-01T00:39:12+5:30
लाखो रूपयाचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना स्वच्छ व निरोगी पाणी पुरविल्यास लाखांदूर ग्रामपंचयत पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे.

नळातून निघाले सडक्या सापाचे अवशेष
लाखांदूर : लाखो रूपयाचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना स्वच्छ व निरोगी पाणी पुरविल्यास लाखांदूर ग्रामपंचयत पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. खाजगी नळातून चक्क सडलेल्या सापाचे अवशेष निघून दुर्गंधी झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाखांदूर हे तालुक्याचे ठिकाण दहा हजार लोकसंख्येचे गाव. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी जि.प. अध्यक्ष अॅड. वसंता ऐंचिलवार यांनी लाखो रूपयाचा निधी खेचून आणला. यापूर्वी दोनदा नळ योजनेसाठी लाखोचा निधी खर्च झाला. मात्र भ्रष्टाचाराने त्रस्त ग्रामपंचायत नागरिकांना आरोग्य व चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यास पुन्हा एकदा अपयशी झाल्याचे दिसून आले. नित्याप्रमाणे पुंडलीक तरोणे यांचे घरासमोरील खाजगी नळाचे दररोज नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी रीघ लावतात. परंतु अचानक नळाच्या पाण्यातून दुर्गंधी येणे सुरू झाले. लगेच नळातून मृत सापाचे सडके अवशेष बाहेर पडू लागले. पिण्यासाठी या पाण्याचा वापर केल्यास आरोग्य बिघडू शकते म्हणून ग्रामपंचायत पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षांना माहती देण्यात आली. यापूर्वी दूषित पाण्यामुळे एका बालकाचा बळी गेला होता. तरीपण या प्रकरणाकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील पंधरा दिवसापूर्वी दोनदा खाजगी नळातून नारू निघाले असताना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला होता. पुन्हा आता नळातून सडक्या सापाचे अवशेष निघाल्याने गावकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता. पाण्याची टाकी ब्लिचिंग पावडरने साफ केली जात नाही. अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज आहे. परंतु निष्काळजीपणा पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याने स्वच्छ व निरोगी पाणी गावकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)